
चीनने मागितली भारताची मदत…
अमेरिकेने सर्वाधिक 34 टक्के टॅरिफ चीनवर लावला होता. त्यामुळे चीनने देखील अमेरिकेवर 34 कर लावला. अमेरिकेने इशारा देत हा कर न हटवल्यास अतिरिक्त कर लावण्याचा इशारा चीनला दिला होता.
तो इशारा खरा ठरला असून चीनवर तब्बल 104 टक्के टॅरिफ कर अमेरिकेकडून लादण्यात आला आहे. हा कर आजपासून (बुधवार) लागू देखील करण्यात आला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफ जाहीर करत नवीन व्यापारी युद्ध छेडल्याची चर्चा आहे.
या व्यापारी युद्धात चीनने भारताकडे मदतीची मागणी केली आहे. चीनच्या दुतावासातील प्रवक्ते यू जिंग यांनी म्हटले की, ‘चीन आणि भारत हे विकसनशील राष्ट्र आहेत. या स्थितीत अमेरिकेचे टॅरिफ धोरण हे विकसनशील राष्ट्रांची प्रगती रोखणारे आहे. त्यामुळे भारत आणि चीनने एकत्र येत या संकटाचा सामना केला पाहिजे.
यू जिंग यांनी म्हटले की, जागतिक व्यापारासाठी आणि विकासाठी सर्व देशांनी एकत्र येत अमेरिकेच्या टेरिफ धोरणाला विरोध केला पाहिजे. अशा टॅरिफ युद्धामध्ये कधीच कोणीही विजयी होत नाही.अमेरिकेच्या या निर्णयाला सर्वांनी मिळून विरोध करायला हवा.
व्यापार युद्धासाठी तयार
चीनने अमेरिकेच्या विरोधात सर्वांनी एकत्र आले पाहिजे असे आवाहन करत व्यापार युद्धासाठी अमेरिकेच्या विरोधात आपण तयार असल्याचे म्हटले आहे. अमेरिका टॅरिफ वाढवण्याची धमकी देऊन एकामागून एक चुका करत आहे. अमेरिकेच्या कराचा परिणाम होईल मात्र त्याने अभाळ कोसळणार नाही, असे देखील चीनने म्हटले आहे.
भारताची सावध पावले
टॅरिफ धोरणावरून जेथे चीनने थेट अमेरिकेसोबत पंगा घेत जशास तसे उत्तर देण्याचे धोरण आखले आहे. भारतावर 26 टक्के टॅरिफ लावला असताना भारताने सावध पावले टाकण्यास सुरुवात केली आहे. वरिष्ठ पातळीवर अमेरिकेच्या धोरणाचा कोणत्या कोणत्या उद्योगांवर परिणाम होईल त्यातून कसे सावरायचे यासाठी रणनीती आखली जात आहे. परराष्ट्रमंत्री एस जयशंकर हे देखील अमेरिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलणी करत आहेत.
शेअर बाजारावर परिणाम होणार
अमेरिकेन राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफच्या केलेल्या घोषणेनंतर शेअर बाजार सातत्याने खाली जात असल्याचे दिसून येत होते. मागील एक दोन दिवसांत शेअर बाजार सावरत असल्याचे चिन्ह होते. मात्र, चीनवर तब्बल 104 टक्के टॅरिफ लावण्याची घोषणा करण्यात आल्याने त्याचा शेअर बाजारावर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.