
दैनिक चालु वार्ता देगलूर प्रतिनिधी -संतोष मनधरणे
देगलूर प्रतिनिधी
४३० मेजर शस्त्रक्रिया करून देगलूर येथील उपजिल्हा रुग्णालयाने महाराष्ट्र राज्यात सर्वप्रथम स्थान प्राप्त झाले आहे. दिनांक सात एप्रिल रोजी जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून येथील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा मुंबई येथे मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
केवळ ५० खाटांची क्षमता असलेल्या उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक आणि वैद्यकीय अधिकारी तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सातत्यपूर्ण कठोर परिश्रमामुळे २०२४-२५ या आर्थिक वर्षात एकूण ९१२ शस्त्रक्रिया करण्यात आल्या असून त्यापैकी ४३० मेजर शस्त्रक्रिया आहेत.देगलूरचे भूमिपुत्र डॉ. नरेश अंबादासराव देवणीकर येथील उपजिल्हा रुग्णालयात रुजू झाल्यानंतर येथील उपजिल्हा रुग्णालयाने कात टाकली आहे.एकेकाळी अतिशय कमी होणाऱ्या शस्त्रक्रियांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात वाढली असून रुग्णांना सेवा देण्याचे कार्यही मोठ्या प्रमाणात वाढले आहे.जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.संजय पेरके यांच्या मार्गदर्शनाखाली देगलूर उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. नरेश देवणीकर हे आपल्या सर्व सहकाऱ्यांना सोबत घेऊन प्रचंड मेहनत करीत आहेत.त्याचाच परिणाम म्हणून संपूर्ण राज्यभरातील उपजिल्हा रुग्णालयाच्या तुलनेत सर्वाधिक शस्त्रक्रिया करण्यात आल्यामुळे येथील उपजिल्हा रुग्णालयाची राज्यपातळीवरील सर्वप्रथम पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.दि.७ एप्रिल रोजी जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून यशवंतराव चव्हाण सभागृह मुंबई येथे महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, यांच्या हस्ते आणि आरोग्य मंत्री प्रकाश आबीटकर, डॉ. मनीषा कायंदे,आरोग्य सचिव डॉ.निपूण विनायक व डॉ. वीरेंद्र सिंग, आरोग्य संचालक डॉ.नितीन अंबाडेकर व डॉ.स्वप्नील लाळे यांच्या प्रमुख उपस्थितीत देगलूर उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.नरेश देवनीकर, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.संजय पेरके, वैद्यकीय अधीक्षक उपजिल्हा रुग्णालय बिलोलीचे डॉ. पांडुरंग पावडे, वैद्यकीय अधिकारी डॉ.अनिल थडके, मनीषा बोईनवाड, श्रीमती गौसिया मोमीन, प्रवीण येरेवाड, शेख जमील अहमद आदींचा सन्मान करून त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.देगलूर उपजिल्हा रुग्णालयाने आपल्या कार्यकर्तृत्वामुळे राज्य पातळीवर सन्मान मिळाल्याबद्दल जनतेतून कौतुक केले जात आहे.