
दैनिक चालु वार्ता उस्माननगर प्रतिनिधी -लक्ष्मण कांबळे
नांदेड / उस्माननगर :- समाज कल्याण विभागामार्फत ८ ते १४ एप्रिल २०२५ या कालावधीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या समता सप्ताहाच्या कालावधीत सामाजिक न्याय विभागाच्या योजना तळागाळातील लाभार्थ्यांपर्यंत पोहचविण्याचे काम सर्वांनी प्राधान्याने करावे, असे आवाहन जिल्हा जात पडताळणी समितीच्या अध्यक्षा फरोग मुकदम यांनी केले आहे.
आज समाज कल्याण कार्यालयाच्या सभागृहात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहाचे उदघाटन त्यांच्या हस्ते झाले. यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे, जिल्हा जात पडताळणी समितीच्या उपाध्यक्ष छाया कुलाल, संशोधन अधिकारी राम बंगाटे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी अनिल सुर्यवंशी, तसेच विविध मंडळाचे व्यवस्थापक व विद्यार्थी आदीची उपस्थिती होती. अनुसूचित जाती, जनजाती व वंचित दुर्बल घटकातील व्यक्तीच्या सर्वागिण विकासाचे ध्येय साध्य करण्यासाठी शासनाकडून विविध कल्याणकारी
योजनांची माहिती सर्वसामान्य जनतेला व्हावी तसेच नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी याउद्देशाने दि.८ एप्रिल ते १४ एप्रिल या कालावधीत राज्यात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर
सामाजिक समता सप्ताह साजरा करण्यात येत आहे. या सप्ताहात समाज कल्याण विभागामार्फत ज्या योजना राबविल्या जातात व त्यांचा फायदा लाभार्थ्यांना दिला जातो त्या योजनांची माहिती जास्तीत जास्त तळागाळातील लाभार्थ्यांपर्यंत पोहचवावी, असे आवाहन जिल्हा जात पडताळणी समितीच्या अध्यक्षा फरोग मुकदम यांनी केले.
सामाजिक समता सप्ताहाच्या निमित्ताने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. यात व्यसनमुक्तीचे कार्यक्रम, तसेच योजनांची माहिती तळागाळातील लोकापर्यंत पोहोचविण्याच्यादृष्टीने जनजागृती करण्यात येणार आहे. प्रकल्प अधिकारी यांच्या अंतर्गत जे समता दुत आहेत त्यांच्यामार्फत पथनाट्यकार्यक्रम विविध ठिकाणी करणार असल्याची माहिती सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांनी प्रास्ताविकेत दिली. तसेच सामाजिक न्याय विभागाच्या योजनांची जनजागृती करण्यात येवून योजनाची माहिती नागरिकांपर्यत पोहोचविण्यात येणार आहे. दि.८ एप्रिल ते १४ एप्रिल पर्यंत भरगच्च कार्यक्रम घेणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी स्वाभिमान सबळीकरण योजनेअंतर्गत श्रीमती कांताबाई मरीबा भंडारे या लाभार्थीला सामाजिक समता सप्ताह निमित्त ४ एकर कोरडवाहू जमीनीचे आदेश वितरीत करण्यात आले. यावेळी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह कार्यक्रमात संविधान प्रास्ताविकेचे सामुहिक वाचन करण्यात आले. यावेळी जिल्हा ग्रंथालय अधिकारी अनिल सूर्यवंशी यांनीही त्यांचे मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन गजानन पांपटवार तर आभार अंजली नरवाडे यांनी मानले.