
दैनिक चालु वार्ता उदगीर प्रतिनिधी -अविनाश देवकते
लातूर (उदगीर) :तीन राज्यांच्या सीमेवर असलेली आणि लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाची कृषी उत्पन्न बाजार समिती म्हणजे उदगीर बाजार समिती. या बाजारात दररोज कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असताना, येथे चालणारा गोंधळ पाहता हा बाजार “गाळ्यांचा जंगलराज” बनला आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
कमी भाड्याचे गाळे – लाखोंच्या व्यवहारासाठी भाड्याने
येथील अनेक प्लॉटधारक फक्त 2 ते 3 हजार रुपये वार्षिक भाड्याने गाळे घेतात, आणि तेच गाळे लाखोंच्या किंमतीत लीजवर इतर अनधिकृत व्यापाऱ्यांना देतात. हे सर्व बाजार समितीच्या डोळ्यादेखत सुरू आहे. यामुळे समितीचे उत्पन्न घटत आहे आणि खरे आडत व्यापारी बाजूला फेकले जात आहेत.
गाळ्यांत शेती नसून इतरच व्यवसाय – कोण देतो परवानगी?
या गाळ्यांत कृषीशी संबंधित नसलेले बँका, मेडिकल, पेंट, प्रेस, लाइट अशा दुकानांचे अतिक्रमण झाले आहे. फक्त अधिक भाडं देणारा असेल, तर त्याला गाळा मिळतो, अशी पद्धत रूढ झाली आहे. यामुळे शेतीशी संबंधित खरे आडत व्यापारी मात्र अडचणीत सापडले आहेत.
बाजार समिती निष्क्रिय – आडत वेल्फेअर असोसिएशन फक्त बघ्याची भूमिका
गाळ्यांच्या वाटपात पारदर्शकतेचा अभाव असून, परवाना एका नावाचा, गाळा दुसऱ्याच वापरात, अशी परिस्थिती सर्रास दिसते. हे सर्व घडत असताना बाजार समिती व आडत वेल्फेअर असोसिएशन फक्त प्रेक्षकाची भूमिका निभावत आहेत. नियम न पाळणाऱ्या गाळाधारकांवर कारवाईचा पत्ता नाही!
शेतकऱ्यांसाठी सुविधा नाही, पण व्यापाऱ्यांसाठी मोकळे गाळे!
शेतकऱ्यांना पिण्याचे पाणी नाही, निवारा नाही, पण व्यापाऱ्यांसाठी मात्र सुसज्ज गाळ्यांची रेलचेल आहे. यामुळे खरी उद्दिष्टे बाजूला पडून पैसा कमावण्याचे साधन म्हणून बाजार समितीचा वापर सुरू आहे.
नागरिक व शेतकऱ्यांचा सवाल: आम्हाला न्याय मिळणार की हे गाळे फक्त पैशाच्या जोरावर विकले जाणार?
सध्या अनेक गाळेधारक व्यवसाय न करता घरी बसलेले आहेत, काहींनी अनधिकृतरीत्या दुसऱ्यांना दिले आहेत – पण समितीकडून कोणतीही कारवाई होत नाही. यामुळे नागरिक, शेतकरी, खरे आडत व्यापारी रस्त्यावर येण्याच्या तयारीत आहेत.
—————————————
“गाळा कुणाचा? हक्क कुणाचा?” – हा सवाल सध्या उदगीर बाजार परिसरात गाजतो आहे.
—————————————