
दैनिक चालु वार्ता देगलूर प्रतिनिधी -संतोष मनधरणे
नांदेड देगलूर
: कै. रावसाहेब अंतापूरकर यांच्या चतुर्थ पुण्यतिथीनिमित्त अंतापूर येथे आयोजित कीर्तन सोहळ्यात ह.भ.प. सोपान महाराज सानप यांनी आपल्या रसाळ वाणीतून उपस्थितांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला परिसरातील भाविकांची मोठी गर्दी झाली होती.
ह.भ.प. सोपान महाराज सानप यांनी कै. आमदार रावसाहेब अंतापूरकर यांच्या आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले, “कै. रावसाहेब अंतापूरकर हे अत्यंत प्रामाणिक व्यक्तिमत्व होते. त्यांनी आपल्या राजकीय आणि सामाजिक जीवनात नेहमीच प्रामाणिकतेला महत्व दिले. त्यांची खरी कमाई म्हणजे त्यांचे प्रामाणिक कर्म होय. त्यांनी केलेल्या जनसेवेमुळे ते आजही लोकांच्या मनात जिवंत आहेत.”
यावेळी बोलताना ह.भ.प. सानप महाराज यांनी आमदार जितेश अंतापूरकर यांच्या कार्याचे कौतुक केले. ते म्हणाले, “आमदार जितेश अंतापूरकर हे देखील आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून प्रामाणिकपणे लोकांची सेवा करत आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेत जनतेने त्यांना दुसऱ्यांदा विधानसभेत पाठवले आहे, हे त्यांच्या वडिलांच्या पुण्याईचे आणि त्यांच्या स्वतःच्या कामाचे फळ आहे.”
कार्यक्रमाला उपस्थित श्रोत्यांनी महाराजांच्या कीर्तनाचा आणि विचारांचा लाभ घेतला. स्वरमणी कैलास पवार, ओमकार जगताप आणि मदंगमणी कृष्णा भोरखडे यांनी उत्कृष्ट संगीत साथ केली, ज्यामुळे कीर्तनाची रंगत अधिक वाढली होती.