दैनिक चालु वार्ता भोकर प्रतिनिधी-विजयकुमार चिंतावार
भोकर / नांदेड : तहसील कार्यालयातील बेजबाबदार कारभाराचा एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका मयत व्यक्तीच्या नावे गौण खनिज उत्खननाची परवानगी देण्यात आली असून, यामुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.
प्राप्त माहितीनुसार, मौजे रायखोड येथील माणिकराव व्यंकोबा भंडरवार यांचे दिनांक २१ एप्रिल २०२१ रोजी निधन झाले असतानाही त्या मयताच्या नावे असलेल्या मौजे रायखोड येथील गट नंबर ४७ मधील गौण खनिज उत्खननासाठी दि. २४ जून २०२१ रोजी म्हणजे अर्जदाराच्या मरणोपरांत म्हणजे तब्बल दोन महिन्यानंतर जिवंत दाखवून “केटीआयएल” कंपनीने अधिकृत परवानगी मिळविली. केटीआयएल कंपनीकडून सादर केलेल्या बोगस अर्जाची शहानिशा न करता डोळे झापून का कसे तत्कालीन तहसीलचे कार्यालयीन प्रमुख तहसीलदार भरत सूर्यवंशी यांच्या कार्यकाळात परवानगी बहाल केल्याने व्यथित झालेले स्थानिक नागरिक तथा समाजसेवक संभाजी चेरकेवाड यांनी सदर काळया कारणाम्याची चौकशी करून कार्यवाही करण्यासाठी पाठपुरावा केला आहे…
केटीआयएल” कंपनीने भोकर – उमरी – कारेगाव – लोहगाव एयू १०७ क्रमांकाचा रस्ता तयार करण्यासाठी
तालुक्यातील मौजे रायखोड येथील गट क्रमांक ४७ मध्ये ५०० ब्रास मुरूम उत्खनन करण्यासाठी परवानगी घेतली होती खरी परंतू या कंपनीने दुसऱ्या लगतच्या गायरान असलेल्या गट क्रमांक ४६ मध्ये, सुमारे १० हजार ५२ ब्रास इतके परिणामापेक्षा जास्त गौणखणीज उत्खनन करून शासनाची दिवसाढवळ्या फसवणूक केली आहे. हे तहसील कार्यालयाने ठेवलेल्या सुनावणीत स्पष्ट झाल्यामुळे “केटीआयएल” कंपनीस कर्तव्य दक्ष तहसीलदार विनोद गुंडमवार यांनी सुमारे ६० लक्ष ३१ हजार २०० रुपयाचा मोठा दंड ठोठावला आहे. आज पर्यंतच्या इतिहासात अनधिकृत गौण खनिज उत्खनन प्रकरणी तालुका महसूल विभागाने एवढा मोठा दंड आकारल्याची पहिली घटना असेल ! हे अभिनंदनीय असले तरी अनाधिकृत जागेत गौण खनिजाचे उत्खनन झाल्यास शासकीय नियमानुसार अधिक पटीत दंड आकारण्यात यावे असे दंडक असतानाही एक पट दंड कोणत्या धर्तीवर आकारण्यात आले हे प्रश्न आणखी अनुत्तरीय आहे. दरम्यान या प्रकरणाचे सोक्षमोक्ष होण्याअगोदरच या प्रकरणास अनुसरून तत्कालीन तहसीलदार भरत सूर्यवंशी यांनी मयत व्यक्तीच्या नावे गौण खनिज उत्खननास परवानगी देऊन सर्वांनाच आश्चर्यचकित केल्याचे दिसून येत आहे…
केटीआयल कंपनीकडून परवानगीसाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांच्या अर्जातील संमतीपत्रावर मृत व्यक्तीच्या अंगठ्याचा ठसा असल्याचे स्पष्ट दिसत आहे, विशेष म्हणजे संमती पत्रासाठी लागणारे दस्त ११ जून २०२१ रोजी घेण्यात आले. ज्यामुळे या प्रकरणात बनावट कागदपत्रांचा वापर झाल्याचा संशय अधिक बळावला आहे. याची उच्चस्तरीय चौकशी होऊन संबंधित दोषिंविरुद्ध पोलिसात गुन्हे दाखल करण्यात यावे अशी मागणी या निमित्ताने होत आहे. यावर संबंधित वरीष्ठ कार्यवाही करतील काय? की आपला सहकारी म्हणून सोडून देतील असा प्रश्न उपस्थित होत आहे.
या प्रकरणी अधिक माहीती जाणून घेण्याकरिता दि. ०९ एप्रिल रोजी भोकर येथील तहसिल कार्यालयात गेलो असता सध्या कार्यरत असलेले तहसीलदार विनोद गुंडमवार कार्यालयात उपस्थित नव्हते ते दौऱ्यावर असल्याचे कळाले, तसेच भ्रमनध्वनी वरही संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे अधिक माहिती जाणून घेता आली नाही.
…………………….