
भूम प्रतिनिधी :
सद्या भूम शहरासाठी अमृत -2 योजनेअंतर्गत वाढीव पाईप लाईनचे काम सुरु आहे. ही पाईप लाईन करण्यात येऊ नये यासाठी भूम शहर सर्व पक्षीय व नागरिकांनी विरोध केला आहे. त्यानतर सहा गावातील नागरिकांनी उपविभागीय अधिकारी, मुख्याधिकारी तथा प्रशासक यांना 2 एप्रिल रोजी भूम ते धाराशिव रस्त्यावर रस्ता रोको करून निवेदन दिलेले आहे. तरीही काम सुरूच होते. पण आता वंजरवाडी, हाडोंग्री, दिंडोरी, आरसोली, सावरगाव या सहा गावातील शेतकऱ्यांनी या योजनेस विरोध केला आहे. काल रात्री वंजरवाडी रस्त्यावर नवीन पाईप घेऊन आलेले वाहन व क्रेन शेतकऱ्यांनी अडवले व त्यांना सरळ वंजरवाडी गावात घेण्यास सांगितले, शेतकऱ्यांनी आलेले पाईप गावात उतरवायला भाग पाडले. सदरील वाहन धारकांने हुज्जत न घालता पाईप सोडून गाडी घेऊन पसार झाला. यावेळी शेतकरी आक्रमक झाले होते. कांही शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला पण उत्तर मिळाले नाही. सकाळी ग्रामपंचायत कार्यालयाजवळ शेतकरी व सरपंच उपसरपंच यांनी बैठक आयोजित करून कोणत्याही परिस्थितीत आरसोली मध्यम प्रकल्पातुन नवीन पाईपलाईन जाऊ दिली जाणार नाही अशी आक्रमक भूमिका घेतली. आरसोली मध्यम प्रकल्पातुन भूम व वाशी या दोन शहरांना पाणी पुरवठा केला जातो. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी उरत नाही. त्यात आता ही नवीन अमृत -2 योजना आरसोली मध्यम प्रकल्पतुन होत असल्याने शेतकरी आंदोलनाच्या भूमिकेत आहेत. वेळ पडल्यास आम्ही कुटूंबासाह जल समाधी घेऊ अशी भूमिका प्रभाकर डोंबाळे यांनी दिली. त्यामुळे आता भूम व वंजरवाडीचा पाणी प्रश्न पेटला म्हणायला हरकत नाही. यावर मुख्याधिकारी तथा प्रशासक काय भूमिका घेणार हे पाहणं औचीत्याचे ठरणार आहे.