
शिखर शिंगणापूर यात्रेतील ही परंपरा जाणून घ्या…
ज्ञान वैराग्य कावडी खांदी| शांती जीवन तयामधी॥ शिवनाम तुम्ही घ्या रे। शिवस्मरणी तुम्ही रहा रे॥ हरिहर कावड घेतली खांदी। भोवती गर्जती संतमांदी॥ एका जनार्दनी कावड बरी।
भक्ती फरारा तयावरी॥ लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री शंभू महादेवाची शिखर शिंगणापूर येथील यात्रा मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे.
हर-हर महादेवच्या जयघोषाने मुंगी घाट दुमदुमून गेला. सायंकाळी भुतोजीबुवा तेली यांची मानाची कावड मुंगी घाटातून मानवी साखळी करून वर घेतली गेली.यात्रेचे मुख्य आकर्षण व शक्ती व भक्तीचा संगम असून या गडावर मुंगी घाटातून हजारो कावडी गड चढून वर येतात.
शिव शंभू यात्रेतील शेकडो वर्षांपासून चालत आलेली प्रथा, परंपरा जपत कावड वारीचा केंद्रबिंदू असलेला मानाच्या कावडी सासवड (जि. पुणे) येथील शिवभक्त तेली भुतोजी महाराज यांच्या मानाच्या कावडीचे आज दुपारी ३ वाजता सोलापूर जिल्ह्यात आगमन झाले. या वेळी माळशिरस माळशिरस तालुका आमदार उत्तमराव जानकर, पंचायत समिती माजी उपसभापती अर्जुन सिंह मोहिते पाटील, पंचायत समिती गटविकास डॉ.आबासाहेब पवार, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रियंका शिंदे, कोथळे गावचे सरपंच माने , तहसीलदार सुरेंद्र शेजुळ, ग्रामसेवक सचिन गोरे,तसेच ग्रामस्थांनी यांनी स्वागत केले.
स्वागतानंतर कोथळे गावच्या ओढ्यात सोलापूर व सातारा जिल्ह्याच्या सरहद्दीवर कावडी भेटीच्या पारंपारिक सोहळा मोठ्या भक्तीमय वातावरणात पार पडला. कोल्हापूर संस्थाच्या कावडीने संत तेली भुतोजी महाराज कावडीला तीन प्रदक्षिणा घालून उराउरी भेट घेतली . खानोटा (ता दौंड) येथून ही कावड येत असते.
सोलापूर- सातारा जिल्ह्याच्या सरहद्दीवरील जमीन सपाटी पासून १०५० मी. खडा उंच मुंगी डोंगर घाट सर करण्यास ५.३० वा सुरुवात झाली. घाट पायथ्याशी महाआरती करत असताना शिव हर हर महादेवाचा जयघोषाने पर्वत रांगेत गर्जत होता.
यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्र मांडवे व मोरोची,मांडकी,पिलीव, नातेपुते ग्रामीण रुग्णालया यांनी कोथळे गावात व मुंगी घाटाच्या पायथ्याशी १० रुग्णवाहिकेसह आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिली होती. यांच्यासह सुमारे ६३ आरोग्य कर्मचाऱ्यांसह आरोग्य सेवा देत होते .माळशिरस पंचायत समिती ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या वतीने मुंगी घाट व भवानी घाटात पाण्याचे टँकर ठेवण्यात आले होते.
शंभू महादेवाच्या पिंडीवर जलाभिषेक केल्यानंतर यात्रा उत्सवाची सांगता होते.यावर्षी कावड वारीला मुंगी घाटातुन एक लाखाहून अधिक शिवभक्तांनी अवघड मुंगी घाट सर केला असल्याचे पोलिसांनी सांगितले.