
शिवसेनेच्या मंत्र्यांचा जिल्ह्यांशी ‘संपर्क’च नाही !
काही दिवसांपूर्वी भाजपने त्यांचे मंत्री नसलेल्या जिल्ह्यांमध्ये संपर्क मंत्र्यांची नियुक्ती केली. भाजपच्या या चालीला काटशह देण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही शिवसेनेचे मंत्री नसलेल्या जिल्ह्यांमध्ये संपर्क मंत्र्यांची नियुक्ती केली.
या नियुक्त्यांना आता एक महिन्याहुन अधिक काळ लोटला. पण शिवसेनेचे हे संपर्क मंत्री कागदावरच आहेत. काही अपवाद वगळता अनेक मंत्री संबंधित जिल्ह्यांकडे फिरकलेलेच नाहीत.
राज्यात शिवसेनेचे संघटन वाढावे, आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत शिवसेनेला यश मिळावे असा उद्देश डोळ्यासमोर ठेवून एकनाथ शिंदे यांनी संपर्क मंत्र्यांची नियुक्ती करत असल्याची घोषणा केली होती. यात 11 मंत्र्यांवर जबाबदारी सोपवण्यात आली आहे. सर्वाधिक चार जिल्हे राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याकडे आहेत. तर भाजपचे प्राबल्य असलेल्या विदर्भातील नागपूर, अमरावती आणि चंद्रपूर या तीन मोठ्या जिल्ह्याची जबाबदारी मंत्री संजय राठोड यांच्यावर सोपवण्यात आली आहे.
याशिवाय मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जिल्हा वगळता इतर जिल्ह्याची जबाबदारी मंत्री गुलाबराव पाटील, भरतशेठ गोगावले, प्रकाश आबीटकर, संजय शिरसाट, योगेश कदम यांच्याकडे आहे. तर आशिष जैस्वाल यांच्याकडे भंडारा-गोंदिया आणि शंभुराज देसाई यांच्याकडे सांगली आणि अहिल्यानगर या जिल्ह्यांची जबाबदारी आहे. पण यातील उदय सामंत, प्रताप सरनाईक आणि योगेश कदम असे काही अपवाद वगळता अन्य मंत्र्यांना संपर्क करायला वेळच मिळालेला नाही.
संजय राठोड यांचा 3 जिल्ह्यांमध्ये एकही दौरा नाही :
उदय सामंत यांचा पुणे दौरा झाला. योगेश कदम यांचा जालना दौरा झाला. प्रताप सरनाईक यांनी पालघरचा दौरा करून तिथे लोकदरबार सुरु केला. पण त्याचवेळी संजय राठो यांचा एकही दौरा या जिल्ह्यात झालेला नाही. त्यांच्या निवडीमुळे या तिन्ही जिल्ह्यातील नेत्यांना आपल्या अडचणी जाणून घेणारे नेतृत्व मिळाले, असे वाटले होते. परंतु, ते फोल ठरले आहे. नागपूर जिल्ह्यातील स्थानिक नेत्यांचे आपसात पटत नसल्याचे अनेकदा समोर आले आहे. त्यामुळेही त्यांनी अद्यापही एकही दौरा केला नसल्याची चर्चा दबक्या आवाजात होत आहे.
हे आहेत संपर्क मंत्री
– गुलाबराव पाटील- परभणी, बुलडाणा
– उदय सामंत- मुंबई उपनगर, पुणे, सिंधुदुर्ग
– शंभुराजे देसाई- सांगली, आहिल्यानगर
– संजय राठोड- नागपूर, चंद्रपूर, अमरावती
– दादाजी भुसे- धुळे, नंदूरबार
– प्रताप सरनाईक- पालघर, सोलापूर
– भरतशेठ गोगावले- हिंगोली, वाशिम
– संजय शिरसाट- नांदेड, बीड
– प्रकाश आबीटकर- अकोला, लातूर
– आशिष जैस्वाल- भंडारा, गोंदिया
– योगेश कदम- जालना