
दैनिक चालु वार्ता इंदापूर प्रतिनिधी-बापु बोराटे
पुणे (इंदापूर):-विद्या प्रतिष्ठान पॉलिटेक्निक कॉलेज, इंदापूरच्या इलेक्ट्रॉनिक्स अॅन्ड टेलीकम्युनिकेशन विभागाच्या २०१४ च्या बॅचमधील माजी विद्यार्थिनी सुप्रिया जगताप हिने पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदाला गवसणी घालत महाविद्यालयाचे नाव उज्वल केले आहे. या उल्लेखनीय यशामुळे संपूर्ण महाविद्यालयात आनंदाचे आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
यानिमित्त महाविद्यालयात दिनांक ११ एप्रिल रोजी सुप्रिया जगताप हिचा विशेष सत्कार समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इलेक्ट्रॉनिक्स विभागाचे विभागप्रमुख प्रा. सोमनाथ चिकणे यांनी केले.
सत्कार प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुजय देशपांडे यांनी सुप्रिया हिस पुष्पगुच्छ प्रदान करून सन्मानित केले. या वेळी सुप्रिया हिने आपल्या PSI पदापर्यंतच्या प्रवासाचा आलेख उलगडत कठोर परिश्रम, सातत्य आणि आत्मविश्वास यामुळेच हे यश मिळवता आले, असे नमूद केले. याप्रसंगी तिने विद्या प्रतिष्ठान पॉलिटेक्निक कॉलेज इंदापूर येथील शैक्षणिक प्रवास कधीही न विसरता येण्याजोगा होता, तसेच महाविद्यालयाने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी केलेले प्रयत्न यांचेच फलित म्हणजे आमच्यासारख्या विद्यार्थ्यांना मिळणारे यश आहे असे मत व्यक्त केले. तिचे विचार उपस्थित शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांना मनापासून भावले.
याप्रसंगी बोलताना प्राचार्य डॉ सुजय देशपांडे यांनी सुप्रिया सारख्या सावित्रीच्या लेकी आज आमच्या महाविद्यालयाचे नाव आपल्या आपल्या क्षेत्रात नक्कीच मोठे करतील व या बाबीचा आम्हाला सदैव अभिमान राहील असा विश्वास व्यक्त केला. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व प्राध्यापक वर्गाने सुप्रिया हिच्या यशाचे मनःपूर्वक कौतुक करत तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
सुप्रिया जगताप हिचे हे यश आजच्या तरुणाईसाठी एक प्रेरणास्त्रोत असून, चिकाटी आणि प्रामाणिक प्रयत्नांनी कोणतीही गोष्ट अशक्य नाही, हे तिने आपल्या कार्यातून सिद्ध केले आहे.