
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी गंगाखेड-प्रेम सावंत
परभणी:जिल्ह्यातील सहा रेल्वे स्थानकांचा “अमृत भारत स्टेशन” योजनेअंतर्गत कायापालट होणार आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील एकूण १३२ रेल्वे स्थानकांचा या योजनेत समावेश आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या उपस्थितीत झालेल्या पत्रकार परिषदेत ही घोषणा करण्यात आली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि मंत्री वैष्णव यांचे आभार मानत सांगितले की, “या योजनेमुळे महाराष्ट्रातील रेल्वे पायाभूत सुविधा अधिक सक्षम आणि आधुनिक होतील.”
परभणी जिल्ह्यातील गंगाखेड, मानवत रोड, परभणी जं., परतूर, पूर्णा जं. आणि सेलू या स्थानकांचे आधुनिकीकरण करण्यात येणार आहे. यामध्ये वेटिंग लाऊंज, फूड कोर्ट्स, स्वच्छतागृहे, लिफ्ट्स, एस्कलेटर्स, डिजिटल सुविधांबरोबरच स्थानकांचे सौंदर्यीकरण व शहरांशी सुसंगत दळणवळण व्यवस्था निर्माण केली जाणार आहे.
गंगाखेड स्टेशनसाठी या पुनर्विकास योजनेत १६ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून, लवकरच कामास सुरुवात होणार असल्याची माहितीही देण्यात आली आहे.