
आमदार संदीप जोशी, हर्षवर्धन सपकाळांवर तुटून पडले, काय दिले आव्हान ?
नागपूरमधील हिंसाचाराची धग अजून कमी झालेली नाही. पण त्यावरून राजकारण चांगलेच तापले आहे. औरंगजेब कबर, नागपूर हिंसाचाराने राज्यातील वातावरण ढवळून निघाले. हा वाद पुढे ओबीसी-दलित प्रतिनिधीत्वाच्या वळणावरून मंगेशकर कुटुंबियांपर्यंत आणि पुढे व्यक्तिगत पातळीवर आला आहे.
भाजप नेते संदीप जोशी यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर सडकून टीका केली आहे.
मंगेशकर कुटुंबियांवरील टीकेवरून वाद
काँग्रेसचे बडे नेते विजय वडेट्टीवार यांनी मंगेशकर कुटुंबावर टीकेची झोड उठवली होती. त्यावरून आमदार संदीप जोशी आणि वडेट्टीवार यांच्यात कलगीतुरा सुरू झाला. आपली संस्कृती सांगते की कोणी गेल्यावर त्यांच्यावर कोणी बोलू नये. मंगेशकर कुटुंबिय लुटारुंची टोळी आहे, असं कसं म्हणू शकते? ठाकरे कुटुंबिय यावर काही बोलत नाही. आज बाळासाहेब ठाकरे असते तर विजय वडेट्टीवार यांना झोडपून काढलं असतं, अशी घणाघाती टीका संदीप जोशी यांनी केली.
मंगेशकर रुग्णालयाचा जो अहवाल येईल त्यावर कारवाई होईल. लता मंगेशकर यांच्या गाण्यामुळे नेहरुंच्या डोळ्यात अश्रू आले. ते अश्रू खोटे होते का? लतादीदींनी अनेक वेळा दान दिलं, वडेट्टीवार यांनी दान दिलं असेल तर ते सांगावं. भारतरत्न लता मंगेशकर यांच्यावर अशा शब्दात बोलणे, त्यांना शोभत नाही. वडेट्टीवार यांच्याबाबत आम्हाला माहित आहे, पण आम्ही बोलणार नाही, असे आमदार जोशी म्हणाले. आता मंगेशकर कुटुंबीयांवर टीका करणं थांबवा असे आवाहन त्यांनी केले.
हर्षवर्धन सपकाळ यांना ललकारले
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पंतप्रधान मोदी राष्ट्रीय स्वंयसेवक संघाच्या प्रमुखपदी दलित, मुस्लीम अथवा महिलेची नेमणूक कधी करणार असा सवाल केला होता. तर सत्ता टिकवण्यासाठी दंगली घडवून महाराष्ट्राची लूट सुरू असल्याचा आरोप केला होता. सपकाळ यांच्या या वक्तव्याचा आमदार संदीप जोशी यांनी चांगलाच समाचार घेतला.
हिंसाचार करणारे हे संघ कार्यालयाचे कुलूप तोडणार होते, असे हर्षवर्धन सपकाळ यांचे वक्तव्य हास्यास्पद असल्याचे जोशी म्हणाले. संघाच्या कुलुपाला हात लावेल अशी कुणाच्या बापात हिंमत नाही. हर्षवर्धन सपकाळ यांच्या *** मध्ये सुद्धा ती हिंमत नाही, अशी व्यक्तिगत टीका जोशी यांनी केली. सपकाळ यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी तसं करून दाखवावं, असे आव्हान सुद्धा जोशी यांनी दिले. सपकाळ हे मुस्लीम समाजाला भडकावत असल्याचा आरोपही त्यांनी केला. सपकाळ यांना हिंसाचार आणि संघाच्या कार्यालयावर दंगलखोर चालून येणार असल्याचे माहिती होते, तर त्यांनी याविषयीची माहिती इंटेलिजन्स, गुप्तवार्ता विभागाला द्यावी असे ते म्हणाले. मराठ्यांनी औरंगजेबाला महाराष्ट्रात गाडले. त्यामुळे संघाची भूमिका योग्य होती असे ते म्हणाले.