
भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी ‘वक्फ’ प्रकरणी दिलेल्या निकालावरुन न्यायव्यवस्थेवर केलेली टिपण्णीने वाद निर्माण झाला आहे. आज (दि.२१) सर्वोच्च न्यायालयाकडे दुबे यांच्या विरोधात अवमान याचिका दाखल करण्यास परवानगी मागण्यात आली.
याचिका दाखल करण्यासाठी तुम्हाला आमच्या मंजुरीची आवश्यकता नाही, असे न्यायमूर्ती बी. आर. गवई आणि ऑगस्टीन जॉर्ज मसीह यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले.
याचिकाकर्ता वकील अनस तन्वीर यांचे ॲटर्नी जनरल यांना पत्र
निशिकांत दुबे यांच्या विरोधात अवमान याचिका दाखल करण्यासाठी वकील अनस तन्वीर यांनी परवानगी मागितली. ते सर्वोच्च न्यायालयात वक्फ कायद्याविरुद्ध दाखल केलेल्या एका याचिकेचे प्रतिनिधित्व करत आहेत. या प्रकरणात याचिकाकर्त्याला ॲटर्नी जनरल यांची परवानगी घेणे आवश्यक आहे, असे खंडपीठाने स्पष्ट केले. यानंतर अनस तन्वीर यांनी ॲटर्नी जनरल आर वेंकटरमणी यांना पत्र लिहून त्यांची मंजुरी मागितली आहे.
काय म्हणाले होते निशिकांत दुबे ?
सर्वोच्च न्यायालयाने वक्फ कायद्यातील काही तरतुदींबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत, त्यानंतर केंद्र सरकारने पुढील सुनावणीपर्यंत कायद्यातील काही तरतुदींच्या अंमलबजावणीवर बंदी घातली. यावर सरन्यायाधीश संजीव खन्ना हे देशातील सर्व गृहयुद्धांसाठी जबाबदार आहेत.जर सर्वोच्च न्यायालयाने कायदे बनवायचे असतील, तर संसद बंद करावी, अशी टिपण्णी भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी ‘एक्स’वर केली होती. दरम्यान, निशिकांत दुबे यांचे विधान त्यांचे वैयक्तिक मत असल्याचे भाजपने म्हटले. पक्षाध्य जेपी नड्डा यांनी पक्षाच्या नेत्यांना अशा प्रकारच्या टिप्पण्या करू नये, असे आवाहन केले आहे.