
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावर कडक उन्हात कुण्या वाहनचालकाला एखाद्या झाडाच्या सावलीत थांबण्याची इच्छा झाल्यास ती गैर ठरेल.
एमएसआरडीसीच्या नागपूर कार्यालयाच्या क्षेत्रात ते दिसणारच नाही. नागपूरच्या कोतेवाडापासून सेलडोहपर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूला रोपटे दिसत नाही. विशेष म्हणजे, या अंतरावर वृक्षारोपणासाठी ३९ कोटींची तरतूद 66 करण्यात आली होती. आता मात्र हिरवळच राहिलेली नाही.
विदर्भाच्या भागातील समृद्धी महामार्गावरची ही दुर्दशा निराशाजनक आहे. वृक्षारोपणातही मोठी गडबड झाल्याची शंका आहे. सेलडोह गावापर्यंत ३०.१४ किलोमीटरसाठी रोपे लावण्यासाठी ३७.६६ कोटींचे टेंडर होते. तर, त्यासाठी ३९.२२ कोटींची रक्कम अलाट करण्यात आली. २०२३ पासून हे वृक्षारोपण दोन वर्षांत करण्याचे ठरले होते. खडकी बांधातून पाणी घेऊन ड्रिप इरिगेशनची व्यवस्था करण्यात आली होती. मात्र, रस्त्याच्या बाजूच्या रोपट्यांची स्थिती बघितली तर दीड दोन फुटांचे अनेक छोटे झाडं वाळल्याचे दिसते. ड्रिपमधून पाणीसुद्धा टपकताना दिसत नाही. त्यामुळे रोपट्यांची देखभाल करण्यात हलगर्जीपणा झाल्याचा अंदाज येतो. कंत्राटानुसार रस्त्याच्या दोन्ही बाजूला ४३ हजार, ९० झाडे लावायची होती तर मधल्या भागात ४२ हजार ६५४ झाडे लावायची होती.
कुणी बांबू दाखवणार का ?
या वृक्षारोपणात बांबू, क्रीपर आदी लावण्याचे ठरले होते. मात्र, वाहन चालविताना त्याचे कुठेही नामोनिशाण दिसत नाही. काही ठिकाणी मोजक्या झाडांची उंची दोन-तीन फूट दिसते. सूत्रांच्या माहितीनुसार, या रोपट्यांच्या देखभालीची जबाबदारी पाच वर्षांची आहे. मात्र, ज्या उन्हाळ्यात देखभालीची जास्त गरज असते, त्याच उन्हाळ्यात मेंटेनन्स होताना दिसत नाही. हे काम एमएसआरडीसी नागपूर कार्यालयाचे एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर, मॅनेजर आणि सुपरिन्टेंडिंग इंजिनिअर / पीडी यांच्या निगराणीत करण्यात आल्याचे सांगण्यात येते.
या प्रकरणात यापूर्वीच कारवाई करण्याचे सांगण्यात आले होते. चुकीचे काम सहन केले जाणार नाही. कंत्राटात ठरल्याप्रमाणेच काम व्हायला पाहिजे. याबाबत मुख्य अभियंत्यांकडे विचारपूस करू, त्यानंतर आवश्यक पावलं उचलली जातील.