
पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या हलगर्जीमुळे गर्भवती महिला तनिषा भिसे यांचा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. या प्रकरणाची विविध समित्यांकडून चौकशी करण्यात आली. ससून रुग्णालयानेही चौकशी करून अहवाल पुणे पोलिसांना सादर केला होत.
मात्र आता याबाबतच एक मोठी अपडेट समोर आली आहे. ईश्वरी उर्फ तनिषा भिसे मृत्यू प्रकरणात चौकशी करणाऱ्या ससून रुग्णालय प्रशासनाकडून चौकशीतच हलगर्जी झाल्याचे समोर येत आहे.
दीनानाथ रुग्णालय प्रकरणात ससून रुग्णालयाचा अहवाल पुणे पोलिसांना देण्यात आला. अहवालातील निष्कर्षानुसार मंगेशकर रुग्णालयाला आधी क्लीन चीट देण्यात आली होती. मात्र ‘ससून’च्या चौकशी अहवालावर पुणे पोलिसांनी प्रश्न उपस्थित केल्यानंतर ‘ससून’ ने एका दिवसात दुसरा अहवाल सादर करून डॉ. सुश्रुत घैसास यांच्याकडून वैद्यकीय हलगर्जी झाल्याचे नमूद करण्यात आले. ससून रुग्णालयाच्या फेर चौकशी अहवालात घैसास यांनी हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवला होता. त्यामुळे पोलिसांनी उपस्थित केलेले मुद्दे ‘ससून’ ने आधी विचारातच घेतले नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
ससून रुग्णालयाने पुणे पोलिसांना दिलेल्या पहिल्या चौकशी अहवालात या प्रकरणाच्या केंद्रस्थानी असलेल्या दीनानाथ रुग्णालय किंवा डॉ. घैसास यांच्याबाबत स्पष्ट असा मुद्दा मांडला नव्हता. मात्र त्यानंतर पुणे पोलिसांनी चार मुद्दे उपस्थित करून ससून रुग्णालय प्रशासनाला पत्र पाठवण्यात आलं होतं. त्या पत्रानंतर प्रशासनाने या प्रकरणात डॉक्टर सुश्रुत घैसास यांची जबाबदारी निश्चित केल्याचे समोर आलं आहे. यामुळे ससून रुग्णालय प्रशासनाकडून चौकशीतच हलगर्जी झाल्याचे बोलले जात आहे.
काय आहे प्रकरण ?
पुण्याच्या दीनानाथ रुग्णालयात गर्भवती महिलेला दाखल करुन घेण्यासाठी डिपॉझिट न दिल्याने तिच्यावर वेळेत उपचार न मिळाल्याने तिचा मृत्यू झाला होता. दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात तिला दाखल करुन घेण्यास टाळाटाळ करण्यात आली होती असा आरोप आहे. तनिषा भिसेंच्या नातेवाईकांकडे लाखोंचे डिपॉझिट मागण्यात आले होते ते पैसे न भरल्यान गर्भवती तनिषा यांना अनेक तास तिष्ठत ठेवण्यात आलं. त्यामुळे त्यांना अखेर दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आला. तेथे त्यांची डिलीव्हरी झाली, त्यांनी जुळ्या मुलींना जन्म दिला, मात्र प्रसूतीनंतर काही काळाने तनिषा भिसे यांचा मृत्यू झाला. गेल्या काही दिवसांपासून हे प्रकरण प्रचंड पेटलं आहे.
मार्गदर्शक सूचना जारी
दरम्यान तनिषा भिसे मृत्यू प्रकरणानंतर राज्य सरकारने धर्मादाय रुग्णालयांसाठी नवे निर्देश जारी केले आहेत. यापुढे अनामत रकमेअभावी, डिपॉझिटअभावी उपचार नाकारू नयेत, कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांवर प्राधान्याने उपचार करण्यात यावेत; तसेच गर्भवतींवरील उपचाराचा आपत्कालीन परिस्थितीत समावेश करावा, असे त्यामध्ये प्रामुख्याने नमूद करण्यात आले आहे. राज्यातील सर्व धर्मादाय रुग्णालयांनी महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजना, आयुष्मान भारत योजना, राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम आदी आरोग्याशी संबंधित सर्व योजना लागू कराव्यात, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.