
मुंबईवर 26 नोहेंबर 2008 साली झालेल्या दहशतवादी हल्ल्यात वीरमरण आलेल्या पोलिस शिपाई अंबादास पवार यांच्या पत्नी श्रीमती कल्पना पवार यांना परिविक्षाधीन पोलिस उपअधीक्षक पदी नियुक्ती देण्यात आली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी श्रीमती पवार यांना परिविक्षाधीन पोलिस उपअधीक्षक पदावरील थेट नियुक्तीचे आदेश प्रदान केले.
माझ्या पतीप्रमाणेच मलाही देशसेवा करण्याची संधी मिळाली आहे अशा शब्दात श्रीमती कल्पना पवार यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या. मुंबईत झालेल्या 26\11 च्या हल्ल्यामध्ये पोलिस दलात कॉन्स्टेबल पदावर कार्यरत असलेले अंबादास पवार हे शहीद झाले होते.
काय झालं होतं त्या रात्री?
26 नोव्हेंबर 2008 रोजी पाकिस्तानमधून दहा दहशतवादी समुद्राच्या मार्गे मुंबईत घुसले होते. सुरूवातीला झालेल्या गोळीबारानंतर हा गँगवॉरचा प्रकार असल्याचा अंदाज पोलिसांनी लावला, नंतर मात्र हा दहशतवादी हल्ला (2008 Mumbai attacks) असल्याचं लक्षात आलं. या हल्ल्यामध्ये मुंबई पोलिसांचे काही धाडसी अधिकारी शहीद झाले.
लष्कर ए तोयबाच्या या अतिरेक्यांनी मुंबईची शान म्हणून ओळख असेलल्या ताज हॉटेलसह सहा ठिकाणी हल्ला केला होता, ज्यात 160 हून अधिक निरपराधांचे प्राण गेले होते. यात आठ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता. तर अजमल कसाब याला पोलिसांनी आपल्या जीवाची बाजी लावून जिवंत पकडलं होतं.
26 नोव्हेंबर रोजी मुंबईतील कामा रुग्णालयाजवळ एटीएस प्रमुख हेमंत करकरे, अतिरिक्त पोलीस आयुक्त अशोक कामटे आणि पोलीस निरीक्षक विजय साळसकर यांच्या हत्येनंतर कसाब आणि त्याच्या दहशतवादी गटाने एक स्कोडा कार हायजॅक केली. ती कार मलबार हिलच्या दिशेने जात होती. या कारला थांबवण्यासाठी डीबी मार्ग पोलिसांच्या एका टीमने गिरगाव चौपाटीवर नाकाबंदी केली. या नाकाबंदीवर कार थांबण्याचे आदेश देण्यात आले होते.
कार थांबवण्यासाठी पोलीस कर्मचारी पुढे सरसावल्यानंतर कसाबने आपल्या एके 47 रायफलने पोलिसांवर फायरिंग केली. यावेळी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक तुकाराम ओंबाळे आणि इतर पोलिसांनी कसाबला पकडण्याचा प्रयत्न केला. तुकाराम ओंबळे न डगमगता निर्भयपणे कसाबवर तुटून पडले यावेळी झालेल्या गोळीबाराच तुकाराम ओंबाळे शहीद झाले आणि पोलीस निरीक्षक संजय गोविळकर जखमी झाले. पोलीस निरीक्षक हेमंत बावधनकर यांनी ड्रायव्हिंग सीटवर बसलेल्या इस्माईल या दहशतवाद्याला ठार केलं आणि कसाबला जिवंत पकडलं.