
दैनिक चालु वार्ता उस्माननगर ( प्रतिनिधी )-लक्ष्मण कांबळे
नांदेड / उस्माननगर :- खूप वेळ उन्हात काम केल्याने शारीरिक समस्या निर्माण होऊ शकतात. त्यातील गंभीर प्रकार म्हणजे उष्मापात (हीट एक्झॉशन) आणि उष्माघात (हीट स्ट्रोक) होय. अनेक दिवस सतत कडाक्याच्या उन्हात काम केल्यानंतर उष्मापात होतो आणि त्यातून होणारी तीव्र समस्या म्हणजेच उष्माघात होय. शरीराने मर्यादेपेक्षा जास्त निर्माण केली किंवा उष्णता शोषून घेतली तर हायपरथर्मिया म्हणजेच अतिउच्च तापमानाचा आजार होतो. उष्माघात हा त्याचाच एक प्रकार आहे. बाहेरचे तापमान प्रमाणाबाहेर वाढले की शरीरातील तापमान नियंत्रित करण्याची यंत्रणा कोलमडते.
उष्माघात म्हणजेच हीट स्ट्रोक किंवा सनस्ट्रोक. ही जीवघेणी अवस्था आहे. यात प्रखर तापमानाला सामोरे गेल्याने शारिरातील उष्णता संतूलन संस्था नाकाम होते. वातावरणातील जास्त तापमान किंवा खूप वेळ उन्हामध्ये खूप शारीरिक कष्ट असलेले काम करणे किंवा अति व्यायाम करणे आणि पाणी, क्षार किंवा इतर तरल पदार्थ कमी प्रमाणात सेवन केल्याने ही परिस्थिति उद्भवते. यातली मुख्य रोगप्रक्रिया म्हणजे अतिउष्णतेने शरीरातल्या प्रथिनांवर दुष्परिणाम होणे व पेशींमधली जीवनप्रक्रिया थांबणे. शरीरातल्या सर्व अवयवातील पेशींमध्ये हा परिणाम होतो. यात मृत्यूचे कारण बहुधा ‘मेंदूसूज’ म्हणजेच एनसेफलोपथी हे असते. यामध्ये शरीराचे तापमान अकस्मात उच्च पातळीवर जाते. योग्य ते उपचार वेळेवर न मिळाल्यास संबंधित व्यक्तीच्या मेंदूच्या उतींना नुकसान पोहोचून व्यक्ती कोमात जाण्याची व दगावण्याची शक्यता असते. जास्त तापमानामुळे शरीरातील महत्त्वाचे अवयव निकामी होतात. उष्माघात हा प्रामुख्याने अर्भकं, लहान मुलं, वयोवृद्ध, पाणी कमी पिणारे लोक, दीर्घ आजारी किंवा मद्यप्राशन करणाऱ्यांमध्ये आढळतो. तसेच हृदयरोग, फुप्फुसांचे आजार, मूत्रपिंडाचे आजार, लठ्ठपणा उच्च रक्तदाब, मधुमेह, मानसिक व्याधीसारख्या आजारांनी त्रस्त व्यक्तींनाही सहज उष्माघात होऊ शकतो. खेळाडूना आणि बराच वेळ घरा बाहेर काम करणाऱ्यांना उष्मापात होऊ शकतो.
उष्मघाताची लक्षणे
चक्कर येणे, मळमळ, उलट्या होणे, डोकेदुखी, दरदरून घाम फुटणे, थकवा येणे आणि स्नायूंना आकडी येणे अशी आहेत. म्हणजे प्रमाणाबाहेर वाढलेले शारीरिक तापमान (१०४ डिग्री पेक्षा जास्त). घाम बाहेर पडत नाही त्यामुळे त्वचा गरम आणि कोरडी होते. घाम येण्याचे थांबते, नाडीची आणि श्वासाची गती वाढलेली असते, रक्तदाब सुरुवातीला वाढतो आणि नंतर कमी होतो, शरीरात ताठरता येते, हात आणि पायात आकडी (क्रांप्स) येतात, मानसिक बदल होतो, चिडचिड होते, भ्रम होतो आणि कोमा म्हणजेच बेशुद्धवस्था येते आणि मृत्यू सुद्धा ओढवू शकतो. हे असे क्रमाक्रमाने होते, बेशुद्धवस्था हा वयस्कांमध्ये उष्माघातचा पहिला संकेत असू शकतो.
———————————————
प्रथमोपचार
शरीरातली जास्त झालेली उष्णता लवकरात लवकर बाहेर काढणे व रक्ताभिसरण खेळते ठेवणे हाच प्रथमोपचार आहे. सर्वप्रथम व्यक्तीला शक्य असल्यास वातानुकूलित जागेत अन्यथा सावलीत वा थंड ठिकाणी हलवावे आणि शरीरावरील जास्तीचे कपडे काढून टाकावेत. त्यामुळे शरीरातील उष्ण तापमान कमी होण्यास मदत होते. शरीराला ओल्या कापडाने पुसून काढावे. त्याच्या आजूबाजूला हवा खेळती ठेवावी. बर्फ उपलब्ध असल्यास व्यक्तीच्या मानेवर, पाठीवर, काखेत आणि मांडीच्या सांध्यात बर्फाचा शेक देण्यास सुरुवात करावी. कारण या जागी रक्तप्रवाह संचय हा त्वचेच्या जवळच असतो व थंडाव्यामुळे शरीराचे उष्णतामान कमी व्हायला मदत होते.
उन्हामुळे नाकातून रक्तस्रव सुरू झाला असेल तर नाकाच्या मांसल भागावर दहा मिनिटे प्रत्यक्ष दाब दिल्यास रक्तस्रव थांबतो. व्यक्तीवर पाण्याचा वर्षाव करावा व्यक्तीला मुर्छा आली असेल तर श्वसनक्रियेची तपासणी करावी. व्यक्ती शुद्धीवर आल्यानंतर त्यास पाणी पिण्यास द्यावे. या काळात उन्हातान्हातले काम बंद ठेवून सावलीत थांबणे आवश्यक आहे.
———————————————-
उन्हापासून घ्यायची काळजी
उष्माघाताचा त्रास टाळण्यासाठी थोडी काळजी घेणे आवश्यक आहे. सकाळी १० ते दुपारी ४ वाजेपर्यंत उन्हाची तीव्रता जास्त असते तेव्हा शक्यतोवर उन्हात फिरणे, काम करणे किंवा खेळणे टाळावे. बाहेर जाणे आवश्यक असल्यास काही गोष्टी पाळल्यास उन्हाचा त्रास कमी होऊ शकतो. शक्य असल्यास दुपारच्या वेळी कामासाठी बाहेर पडू नका. सकाळी किंवा संध्याकाळी उशिरा कामांची विभागणी करा. अगदीच आवश्यक असेल सौम्यरंगांचे आणि ढिले कपडे वापरावे. टाइट जीन्स आणि भडक कपडे वापरणे टाळावे. टोपी, कानाला आणि डोक्याला रुमाल किंवा स्कार्फ बांधवा, छत्रीचा वापर करावा. जवळ पाण्याची बाटली ठेवावी. गरजेप्रमाणे मधून मधून पाणी प्यावे. तापमानवाढीबरोबरच पाणी पिण्याचे प्रमाण वाढवावे. तहान लागण्याची वाट न पाहता दररोज ८ ते १० ग्लासपेक्षा जास्त पाणी प्यावे. तसेच नारळपाणी, ताज्या फळांचा रस, ताक, लस्सी, कांजी, लिंबूपाणी, तसेच ओआरएस भुकटी पाण्यात टाकून घेत राहावी. साखरेचे वा अल्कोहोलचे प्रमाण जास्त असलेली पेये घेऊ नयेतछ. त्यामुळे शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी होते. तसंच बाहेरील थंड पेय घेणं टाळावे. आहारमध्ये काकडी, संत्री, कलिंगड आणि लिंबू, कांदा यांचा भरपूर वापर करावा.
——————————————–
उस्माननगर परिसरामध्ये पाणी टंचाई असल्यामुळे दुषीत पाणी पिण्यात येवू शकते .त्यामुळे अतिसार ,काविळ ,विषमज्वर, इत्यादीआजार होऊ शकतात हे आजार टाळण्यासाठी पाणी उकळून थंड करून प्यावे .व काही त्रास जाणवल्यास तात्काळ आपल्या प्रा. आरोग्य केंद्र उस्मानगर येथे संपर्क साधावा आसे आवाहन डाॅ.सौ.किरण दुलेवाड यांनी केले आहे.