
साताऱ्यातील घटना, रात्री उशिरापर्यंत चालली शोध मोहीम…
रितेश देशमुखच्या आगामी ‘राजा शिवाजी’ सिनेमाची सध्या चांगलीच चर्चा आहे. या सिनेमाच्या सेटवर एक डान्सर नदीत बुडाला असल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. अचानक घडलेल्या या घटनेमुळे सेटवर सर्वांना धक्का बसला.
रात्री उशीरापर्यंत संबंधित तरुणाचा रेस्क्यू टीमने शोध घेऊनही त्याचा शोध लागला नाही. बुधवारी सकाळी पुन्हा शोध मोहीम हाती घेतली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
कशी घडली घटना
ही धक्कादायक घटना काल (मंगळवार दि. २२ रोजी) सायंकाळी साडेपाच वाजता घडली. साैरभ शर्मा असे नदीत बुडालेल्या तरूणाचे नाव आहे. सौरभ हा २८ वर्षांचा असून तो मुंबईतील घाटकोपर भागात राहणारा आहे. तो मूळचा राजस्थानचा आहे. मंगळवारी दिवसभर संगम माहुली नदीकाठी शुटिंग सुरू होते. सायंकाळी पाच वाजता शुटिंग बंद करण्यात आले. त्यानंतर चित्रपटात काम करणारे सात कलाकार अंघोळीसाठी नदीत उतरले. यामध्ये डान्सर साैरभ शर्मा सुद्धा सर्वांसोबत अंघोळीसाठी गेला होता. पोहायला गेला असताना अचानक साैरभ नदीतील भोवऱ्यामध्ये बुडाला. तो दिसेनासा झाल्यानंतर त्याचे इतर सहकलाकार नदीतून बाहेर आले.
संबंधित तरुणांनी या घटनेची माहिती सातारा शहर पोलिसांना दिली. पोलिसांनी तातडीने शिवेंद्रसिंहराजे रेक्स्यू टीमला सोबत घेऊन संगम माहुली येथे धाव घेतली. बोटीच्या साह्याने साैरभ शर्मा याचा रेक्स्यू टीमने शोध घेतला. मात्र, अंधार झाल्याने शोध मोहीम थांबविण्यात आली. त्याचा थांगपत्ता लागला नाही. बुधवारी सकाळी पुन्हा शोध मोहीम राबविली जाणार असल्याचे पोलिस निरीक्षक राजेंद्र मस्के यांनी सांगितले.
तर जीव वाचला असता
संगम माहुली नदीत मधोमध मोठा भोवरा आहे. या भोवऱ्यामध्ये आतापर्यंत बऱ्याचजणांना जीव गमवावा लागला आहे. शुटिंगमधील कलाकार व इतर नागरिकांना या भोवऱ्याबाबत माहिती नाही. शुटिंगसाठी पोलिस बंदोबस्त संबंधितांनी मागवला असता तर कदाचित पोलिसांनी या भोवऱ्याजवळ कोणालाही जाऊ दिले नसते. बऱ्याचवेळेला या ठिकाणी पोलिस बंदोबस्ताला जातात. त्यावेळी पोहोणाऱ्या लोकांना त्या भोवऱ्यापासून पोलिस जागृत करतात.