
फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका…
पाकिस्तानी नागरिकांवरून राज्यातील महायुती सरकारमध्ये समन्वयाचा आभाव असल्याचं रविवारी (२७ एप्रिल) पाहायला मिळालं होतं. केंद्र सरकारने भारतात आलेल्या पाकिस्तानी नागरिकांना २७ एप्रिलपर्यंत देश सोडून जाण्याचे आदेश दिले होते.
महाराष्ट्रातही अनेक पाकिस्तानी नागरिक वेगवेगळ्या व्हिसावर आले आहेत. मात्र, महाराष्ट्रातील १०७ पाकिस्तानी नागरिक बेपत्ता असल्याचं वक्तव्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं होतं. तर, राज्यात आलेल्या पाकिस्तानी नागरिकांपैकी एकही जण बेपत्ता नाही, असं फडणवीस म्हणाले होते. दोन्ही नेत्यांच्या या परस्परविरोधी वक्तव्यांवर फडणवीस यांनी आज स्पष्टीकरण दिलं.
देवेंद्र फडणवीस यांनी काही वेळापूर्वी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. यावेळी ते म्हणाले, “बऱ्याचदा नेत्यांना अधिकारी वेगवेगळी माहिती देत असतात. त्यानुसार नेते वक्तव्य करतात. केंद्र सरकारच्या आदेशानुसार जे पाकिस्तानी नागरिक आपला देश सोढून जायला हवे आहेत त्यांची आम्ही यादी तयार केली आहे. त्यांची ओळख पटवली आहे. कोणतीही व्यक्ती त्यातून वाचलेली नाही. त्यांना बाहेर पाठवलं जाणार असून सध्या पोलीस त्यांच्यावर लक्ष ठेवून आहेत. त्यांची अंतिम आकडेवारी आली की आम्ही ती जाहीर करू. बऱ्याचदा त्या आकडेवारीवरून गोंधळ होतो. त्यामुळे आम्ही तुम्हाला अंतिम आकडेवारी देऊ. सर्व पाकिस्तानी लोकांना राज्याबाहेर, देशाबाहेर पाठवल्यानंतरची आकडेवारी आम्ही जाहीर करू.
मुख्यमंत्री म्हणाले, केंद्र सरकारने आदेश दिल्यानंतर लगेच आम्ही राज्यातील पाकिस्तानी नागरिक शोधले, त्यांच्यापर्यंत केंद्र सरकारचा संदेश पोहोचवून त्यांना बाहेर जाण्यास सांगितलं. आत्ता आम्ही त्यांच्यावर लक्ष ठेवून आहोत. त्यांच्या हालचाली ट्रॅक करत आहोत.
महाराष्ट्रात आलेल्या सिंधी लोकांबाबत सरकारची वेगळी भूमिका
दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं की सिंधी समाजातील हिंदू धर्मीय लोकांना परत जावं लागणार नाही. अनेक सिंधी लोक लाँग टर्म व्हिसा घेऊन महाराष्ट्रात आले आहेत. त्यांनी भारतीय नागरिकत्व मिळावं यासाठी अर्ज केले आहेत. त्यांनी भारत सोडण्याचं काहीच कारण नाही. केवळ मर्यादित कालावधीचा व्हिसा घेऊन भारतात आलेल्या नागरिकांना ४८ तासांच्या आत भारत सोडण्याचे आदेश केंद्र सरकारने दिले होते. याबाबतची राज्य सरकारने आपली जबाबदारी पार पाडली आहे. उर्वरित काम काही वेळात पूर्ण होईल. अनेक पाकिस्तानी नागरिक महाराष्ट्रात होते, त्यांची ओळख पटवून त्यांना माघारी पाठवलं आहे.