
एकनाथ शिंदेंसमोर न्यायमूर्ती थेट बोलले !
घटनेला 75 वर्षे पूर्ण झाल्यानंतरही सामान्य माणसाला वेळेवर न्याय देऊ शकत नाही असे चित्र निर्माण झाले आहे… असे सर्वात मोठे विधान सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक यांनी केले आहे.
ठाणे जिल्हा न्यायालय आवारातील जिल्हा व सत्र न्यायालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन आयोजित प्रसंगी कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदेही उपस्थित होते.
काय म्हणाले न्यायमूर्ती अभय ओक?
आपल्या घटनेला 75 वर्षे पूर्ण झाल्यानंतरही आपण सामान्य नागरिकांना वेळेवर न्याय देवू शकत नाही, याची आपल्याला जाणीव असली पाहिजे. आजच्या परिस्थितीत सामान्य माणसाला लवकर न्याय मिळण्यासाठी आवश्यक तो विचार आणि उपाययोजना करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक यांनी केले.
यावेळी बोलताना अभय ओक यांनी एक महत्त्वाचे विधान केले. ठाणेकरांना मी थोडक्यात सांगतो, जुन्या पिढीतील ठाणेकरांना याची जाणीव आहे. असेही प्रयत्न ठाण्यात झाले की न्यायालयात न नेता लोकांना कुठेतरी न्यायालयाबाहेर नेऊन न्याय देण्याचा प्रयत्न होत होता. हे का होत होते तर आपण कुठेतरी कमी पडत होतो याचा विचार केला पाहिजे.. असं ते म्हणाले.
तसेच “नुसत्या इमारती बांधून चालत नाहीत. इमारतीमध्ये साधनसुविधा आल्या, नवीन तंत्रज्ञान आले मात्र त्याने प्रश्न सुटत नाहीत. आपल्याला रोज प्रयत्न करुन काल ज्या पद्धतीने न्याय दिला त्यापेक्षा चांगले काम उद्या केले पाहिजे, परवा केले पाहिजे. आजच्या परिस्थितीत सामान्य माणसाला लवकर न्याय मिळण्यासाठी आवश्यक तो विचार आणि उपाययोजना करणे आवश्यक आहे. न्यायव्यवस्थेतीशी संबंधित जे न्यायाधीश आहेत त्यांनी न्यायव्यवस्थेतील ज्या उणीवा आहेत त्याचा आपण विचार केला पाहिजे, आपण कुठे कमी पडतो याचा विचार केला पाहिजे…असंही न्यायमूर्ती अभय ओक म्हणाले
दरम्यान, 2 वर्ष सर्वोच्च न्यायालयाच्या माध्यमातून जुने खटले निकाली कसे काढता येतील, याचा ॲक्शन प्लॅन तयार करण्यात आला आहे. या ॲक्शन प्लॅनच्या अंमलबजावणीत ठाणे अग्रेसर आहे. हे केवळ सर्व वकिलांनी सहकार्य केल्यामुळेच शक्य झाले आहे. सर्वसामान्य नागरिकांना “क्वालिटी जस्टीस” मिळायला हवा. त्याकरिता सर्वांनी मिळून सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळेल, असे काम करू या, असे आवाहनही त्यांनी शेवटी केले.