
आनंदोत्सव साजरा करताना वडिलांना हार्ट ॲटॅक; आनंदी घरावर दु:खाचा डोंगर…
मुलगी आयएएस (IAS) झाल्याचा आनंदोत्सव साजरा करताना वडिलांना हृदयविकाराचा तीव्र झटका येऊन त्यात त्यांचे हृदयद्रावक निधन झाल्याची घटना यवतमाळच्या महागाव तालुक्यातील वागद ईजारा येथे घडली.
लेक कलेक्टर झाल्याच्या आनंदोत्सवावर दुःखाचं सावट पसरलं आहे. प्रल्हाद खंदारे असं मृत्यू झालेल्या बापाचं नाव आहे. खंदारे हे पुसद पंचायत समितीचे सेवानिवृत्त विस्तार अधिकारी होते.
प्रल्हाद खंदारे यांची मुलगी मोहिनी हिची केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होऊन आयएएस अधिकरी म्हणून निवड झाली. मुलगी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होऊन आयएएस अधिकारी झाल्याचा आनंदोत्सव खंदारे परिवाराकडून साजरा केला जात असताना प्रल्हाद खंदारे यांना ह्रदयविकाराचा झटका आला. त्यानंतर नातेवाईकांनी त्यांना तात्काळ खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. परंतु डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केलं. या घटनेमुळे मुलीच्या आयएएस अधिकारी पदी झालेल्या निवडीचा आनंदोत्सव साजरा करणाऱ्या खंदारे परिवारावर आता दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यात एका मुलीने आयएएस परीक्षा उत्तीर्ण केली. या यशाचा आनंद साजरा करण्यासाठी कुटुंबीयांनी मोठा कार्यक्रम आयोजित केला होता. मात्र, आनंदात असतानाच तिच्या वडिलांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यांचे निधन झाले. या घटनेमुळे मुलीच्या यशाचा आनंद आणि कुटुंबातील सदस्यांचा उत्साह दु:खात बदलला. प्रल्हाद खंदारे यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, आयएएस झालेली मुलगी असा बराच मोठा आप्त परिवार आहे.