
पहलगाम हल्ल्यानंतर सरकार पाकिस्तानवर कोणतीही कारवाई करो, आम्ही त्यांच्यासोबत आहोत असं वक्तव्य वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केलं. सरकारला जर वाटलं की युद्धासाठी तिजोरीमध्ये पैसे नाहीत तर त्यासाठी निधी उभारू असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले.
राष्ट्रध्वजाखाली एकत्र येत 2 मे रोजी आम्ही हुतात्मा चौकात निदर्शने करू असं त्यांनी जाहीर केलं.
प्रकाश आंबेडकर म्हणाले की, “पहलगाम हल्ल्यानंतर भारताने सिंधू पाणी वाटप करार रद्द करण्याची घोषणा केली. त्यासाठी एक पत्र पाकिस्तानला पाठवण्यात आलं. त्यावरून पाकिस्तानला जाणारं पाणी आता अडवलं जाणार, पाकिस्तानची कोंडी केली जाणार असं बोललं गेलं. पण जे पत्र पाकिस्तानला पाठवण्यात आलं आहे त्यामध्ये पाणी थांबवलं आहे आणि थांबवणार आहोत असं कुठेही म्हटलं नाही. त्यामध्ये जी भाषा वापरली आहे त्यावरून ठोस असं काहीच समोर येत नाही. लोकांना यातील सत्य परिस्थिती माहिती नाही. त्यामुळे हे समोर आलं पाहिजे.
कारवाईसाठी सरकारला पाठिंबा
प्रकाश आंबेडकर म्हणाले की, “सरकारच्या कारवाईला पाठिंबा देण्यासाठी आम्ही 2 मे रोजी मुंबईतील हुतात्मा स्मारक येथे निदर्शने करणार आहोत. पाकिस्तानवर कारवाई करण्यासाठी लष्कर तयार आहे. पण राजकीय नेतृत्व त्यासाठी तयार नाही. त्यामुळे त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी, सत्ताधाऱ्यांना निर्णय घेण्याची ताकद देण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी बसणार आहोत. जर सरकारला वाटलं की युद्धासाठी तिजोरीमध्ये पैसे नाहीत, तर आम्ही त्यासाठी निधी उभारू.
राष्ट्रध्वजाच्या खाली एकत्र येण्याचं आवाहन
कारवाई करण्यासाठी सरकारचे मनोबल वाढावे यासाठी करण्यात येणाऱ्या निर्दशनासाठी आम्ही सर्व पक्षीयांना सहभागी होण्याचं आवाहन करतो असं प्रकाश आंबेडकर म्हणाले. तुम्ही घेतलेला निर्णय आम्हाला मान्य असेल हा संदेश देण्यासाठी आम्ही हा निर्णय घेतला आहे. त्यासाठी राष्ट्रध्वजाच्या खाली आम्ही एकत्र येणार आहोत असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले.
राज्य सरकारमध्ये संभ्रम आहे का?
प्रकाश आंबेडकर म्हणाले की, राज्यात असलेल्या पाकिस्तानी नागरिकांना परत पाठवण्याबाबत मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वक्तव्याबाबत वेगवेगळेपणा आहे. देवेंद्र फडणवीस म्हणतात की सगळ्याच नागरिकांना परत पाठवण्यात आलं आहे. तर शिंदे म्हणतात की अद्याप 107 नागरिक राज्यात राहतात. यावरुन कोण खरं बोलतंय हे समजत नाही.