
पण संभाजीनगरच्या पाणीप्रश्नावर गप्प !
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काल छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर होते. संपूर्ण दिवस त्यांचे शहरात विविध कार्यक्रम होते. उद्योजकांच्या पुरस्कार वितरण सोहळ्यात फडणवीस यांनी मराठवाड्याला दुष्काळ मुक्त करणार असल्याचे सांगत टाळ्या मिळवल्या.
समुद्रात वाहून जाणारे पाणी वळवून येत्या पाच-सात वर्षात मराठवाडा दुष्काळ मुक्त करणारच, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मात्र गेल्या वीस वर्षापासून नियमित पाणी पुरवठ्यासाठी टाहो फोडणाऱ्या संभाजीनगरकरांच्या पाणी प्रश्नावर फडणवीस गप्प राहिले.
विशेष म्हणजे 2022 मध्ये राज्याच्या सत्तेत विरोधी पक्षनेते असतांना देवेंद्र फडणवीस यांनी याच संभाजीनगरात येऊन जन आक्रोश मोर्चा काढला होता. पाण्याचे रिकामे हंडे घेऊन महापालिकेच्या प्रवेशद्वारावरच सभा घेत तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारवर टीका केली होती. आमची सत्ता आल्यावर सहा महिन्यात संभाजीनगरकरांना पाणी देण्याचा शब्द फडणवीस यांनी दिला होता. सहा महिने सोडा, पण सहा वर्ष होत आली तरी नागरिकांच्या नळाला पाणी नाही, अशी परिस्थिती आहे.
दुसरीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने ‘लबाडांनो पाणी द्या’ म्हणत 13 एप्रिलपासून शहरात आंदोलन सुरु केले आहे. महिनाभराच्या आंदोलनानंतर आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली पाण्यासाठी शहरात मोर्चा काढण्याचेही नियोजन आहे. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विभागीय आयुक्त कार्यालयातील आॅनलाईन बैठकीतून शहरासाठी सुरु असलेल्या 2740 कोटींच्या पाणी योजनेचा आढावा घेतला होता. तसेच तातडीने त्रुटी दूर करुन योजना पूर्ण करण्याच्या सूचनाही दिल्या.
प्रत्यक्षात मात्र संभाजीनगरची पाणी पुरवठा योजना अजून वर्षभर तरी पूर्ण होणार नाही, अशी परिस्थिती आहे. तरीही सत्ताधाऱ्यांकडून लवकरच योजना पूर्ण होणार आणि नागरिकांना पाणी मिळणार, अशी दिशाभूल केली जात आहे. मुख्यमंत्री काल संभाजीनगर दौऱ्यावर असल्यामुळे ते या विषयावर ठोस काही तरी बोलतील, अशी अपेक्षा होती. उद्योजकांच्या कार्यक्रमात मराठवाड्याला दुष्काळ मुक्तीची जुनीच घोषणा फडणवीस यांनी नव्याने केली.
मात्र ज्या संभाजीनगरात तीन वर्षापुर्वी आपण शहरवासियांच्या पाण्यासाठी जन आक्रोश मोर्चा काढला होता, त्यावेळी दिलेल्या आश्वासनाचा विसर फडणवीस यांना पडल्याचे दिसून आले. पाण्यासाठी सुरु असलेल्या आंदोलनावर ते काही बोलले नाही, की पाणी पुरवठा योजनेचे काम पूर्ण कधी होणार? हे ही सांगितले नाही. त्यामुळे नेमकी लबाडी कोण करतयं? सत्ताधारी की विरोधक, असा प्रश्न सामान्यांना पडला आहे.