
दिल्ली : पहलगामधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध आणखी ताणले गेले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कॅबिनेट सुरक्षा समितीची बैठक घेऊन काही महत्त्वाचे निर्णय घेतले
त्यामध्ये, पाकिस्तानी नागरिकांना देश सोडून जाण्याचे आदेश देण्यात आले असून सिंधु जल करारासंदर्भातही महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. दुसरीकडे भारतीय सैन्य दलाला अलर्ट राहण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे, जगाचे लक्ष भारत आणि पाकिस्तानकडे लागले आहे. काही दिवसांपूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रतिक्रिया देताना हल्ल्याची घटना वाईट असल्याचे म्हटले. तसेच, दोन्ही देश मला जवळचे आहेत, ते आपापसात हा वाद मिटवतील, असे ट्रम्प यांनी म्हटले होते. आता, भारताचा शेजारी असलेल्या चीननेही (China) पहलगाम हल्ल्यानंतर 4 दिवसांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. दोन्ही देशांनी परिस्थिती शांत ठेवण्यासाठी घेतलेल्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो, असे चीनने म्हटलं आहे.
काश्मीरच्या पहलगाम हल्ल्याबाबत अमेरिकेनंतर आता चीननेही प्रतिक्रिया दिली आहे. चीन हा भारत आणि पाकिस्तानचा शेजारी देश आहे. त्यामुळे, चीनच्या प्रतिक्रियेला अधिक महत्त्व आहे. काश्मीरमधील हल्ल्यानंतर दोन्ही देशातील परिस्थिती शांत ठेरण्यास मदत करणाऱ्या प्रत्येक निर्णय, उपाययोजनांचे चीन स्वागत करतो. तर, लवकरात लवकरच या हल्ल्याच्या घटनेची चौकशी करण्याच यावी, त्यास आमचा पाठिंबा असेल, असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते गुओ जियाकुन यांनी म्हटलं आहे. चीन हा भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांचा शेजारी आहे. त्यामुळे, दोन्ही देश आपल्या बाजूंनी संयम बाळगतील, एकाच दिशेने काम करतील, संवाद आणि सल्लामसलतीद्वारे हा प्रश्न योग्यरित्या हाताळतील, अशी आम्हाला आशा आहे. दोन्ही राष्ट्र संयुक्तपणे आपल्या प्रदेशात शांतता आणि स्थैर्य राखतील, अशी अपेक्षा चीनने व्यक्त केली आहे.
पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय नौदलाची ताकद वाढवण्यासाठी भारत आणि फ्रान्समध्ये 26 राफेल नौदल लढाऊ विमानांच्या खरेदीसाठी 63,000 कोटी रुपयांचा महत्त्वपूर्ण संरक्षण करार करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. दिल्लीतील बैठकीत या करारावर दोन्ही देशांनी स्वाक्षऱ्या केल्याचे समजते. या करारामुळे भारतीय नौदलाची सामरिक क्षमता मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. नव्या करारामुळे भारताकडे असलेल्या राफेल लढाऊ विमानांची एकूण संख्या आता 62 वर पोहोचणार आहे. दुसरीकडे स्वीडनने भारतीय सैन्याला एक महत्त्वाचं शस्त्र पुरवलं आहे. कार्ल गुस्ताफ रॉकेट लाँचर भारताला देण्यात आलेले आहे. सर्जिकल स्ट्राइक हे कार्ल गुस्ताफ रॉकेट लाँचरने केली जातात, हे या शस्त्राचे वैशिष्ट्य आहे. स्वीडनच्या साब कंपनीने सर्जिकल स्ट्राइकसाठी भारताला हे शस्त्र पुरवले आहे.