
35 चेंडूत शतक ठोकणारा 14 वर्षांचा वैभव सूर्यवंशी आहे तरी कोण ?
भारतीय क्रिकेटच्या क्षितिजावर एक नवा तारा उदयास आला आहे, आणि त्याचे नाव आहे वैभव सूर्यवंशी. वय फक्त 14 वर्षे, पण क्रिकेटच्या मैदानावर त्याने सोमवारी (28 एप्रिल) अशी काही जादू दाखवली की, क्रिकेट विश्वात त्याच्याच नावाची चर्चा आहे.
आयपीएल 2025 मध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळताना वैभवने अवघ्या 35 चेंडूत शतक ठोकून इतिहास रचला आहे. IPL मधील सर्वात कमी वयात शतक ठोकणारा क्रिकेटर बनलाय. हा तरुण खेळाडू कोण आहे, आणि त्याने एवढ्या कमी वयात ही ऐतिहासिक कामगिरी कशी साध्य केली? याविषयी आपण सविस्तरपणे जाणून घेऊया.
35 चेंडूत शतक, IPL मधील ऐतिहासिक कामगिरी
28 एप्रिल 2025 रोजी राजस्थान रॉयल्सच्या सामन्यात वैभव सूर्यवंशीने क्रिकेट विश्वाला थक्क करणारी कामगिरी केली आहे. अवघ्या 35 चेंडूत 100 धावा ठोकत त्याने आयपीएलमधील सर्वात कमी वयातील शतकाचा विक्रम आपल्या नावावर केला. या खेळीत त्याने तब्ब 11 षटकार आणि 7 चौकार लगावले. त्याच्या आक्रमक फलंदाजीने गुजरात टायटन्सच्या दिग्गज गोलंदाजांचा आत्मविश्वासही ढासळला.
कोण आहे वैभव सूर्यवंशी?
बिहारच्या समस्तीपुर जिल्ह्यातील ताजपुर गावात शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या वैभवने वयाच्या अवघ्या चौथ्या वर्षी क्रिकेट खेळायला सुरुवात केली. त्याचे वडील संजीव सूर्यवंशी यांनी त्याच्या क्रिकेटच्या स्वप्नांना पंख दिले. कुटुंबाने आर्थिक अडचणींना तोंड देताना जमीन विकण्यापर्यंत मजल मारली, पण वैभवच्या प्रतिभेला खुलवण्यासाठी त्यांनी कधीच माघार घेतली नाही.
वैभवने स्थानिक क्रिकेट स्पर्धांमधून आपली चमक दाखवली आणि लवकरच बिहार क्रिकेट असोसिएशनच्या (BCA) नजरेत आला. त्याच्या विस्फोटक फलंदाजीमुळे त्याला वयाच्या 12व्या वर्षीच रणजी ट्रॉफीमध्ये पदार्पणाची संधी मिळाली, ज्यामुळे तो प्रथम श्रेणी क्रिकेट खेळणारा सर्वात कमी वयाचा भारतीय खेळाडू ठरला.
क्रिकेटमधील कामगिरी
वैभवने आपल्या कारकिर्दीत अनेक विक्रम नोंदवले आहेत:
अंडर-19 यूथ टेस्ट: 2024 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध चेन्नईत खेळताना त्याने 58 चेंडूत 104 धावांची खेळी केली, ज्यामध्ये 14 चौकार आणि 4 षटकारांचा समावेश होता. हे अंडर-19 टेस्टमधील भारतासाठी सर्वात वेगवान शतक ठरलं.
विजय हजारे ट्रॉफी 2024-25: वयाच्या 13 व्या वर्षी त्याने लिस्ट-ए क्रिकेटमध्ये पदार्पण केले आणि सर्वात कमी वयात लिस्ट-ए खेळणारा भारतीय खेळाडू बनला.
आयपीएल 2025: राजस्थान रॉयल्ससोबतचा प्रवास
आयपीएल 2025 च्या लिलावात वैभव सूर्यवंशीने सर्वांचे लक्ष वेधले. राजस्थान रॉयल्सने त्याला 1.1 कोटी रुपयांना आपल्या ताफ्यात सामील केले, ज्यामुळे तो आयपीएल करार मिळवणारा सर्वात कमी वयाचा खेळाडू ठरला. दिल्ली कॅपिटल्सनेही त्याच्यावर बोली लावली होती, पण राजस्थानने बाजी मारली.
वैभवने आयपीएलमध्ये आपल्या पदार्पणातच लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकत आपल्या इराद्यांची चुणूक दाखवलेली. त्याने 34 धावांची खेळी खेळलेली, ज्याने सर्वांना प्रभावित केलेले. त्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरूविरुद्ध 16 धावा आणि अखेरीस 35 चेंडूत शतकासह त्याने आपली प्रतिभा सिद्ध केली.
प्रशिक्षक आणि दिग्गजांचे मत
वीरेंद्र सेहवाग: वैभवला आयपीएलमध्ये 20 वर्षे खेळण्याचे लक्ष्य ठेवण्याचा सल्ला देताना सेहवाग म्हणाले, “वैभवकडे अफाट प्रतिभा आहे, पण त्याने दीर्घकालीन करिअरवर लक्ष केंद्रित करावे.”
राहुल द्रविड: वैभवच्या 35 चेंडूत शतकानंतर द्रविड उभे राहून टाळ्या वाजवत होते, जे त्याच्या खेळीच्या प्रभावाचे द्योतक आहे.
राजस्थान रॉयल्सने यशस्वी जायसवाल, ध्रुव जुरेल आणि रियान पराग यांच्यासारख्या युवा खेळाडूंना संधी देऊन त्यांचे करिअर घडवले आहे. वैभव सूर्यवंशी हा त्यांच्या याच धोरणाचा हिस्सा आहे. संघाने त्याला सलामी फलंदाज म्हणून संधी दिली, आणि जॉस बटलरच्या अनुपस्थितीत यशस्वी जायसवालसोबत त्याने सलामीची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली.
वैभवसमोर कोणती आव्हाने?
वैभव सूर्यवंशीच्या पुढील प्रवासात अनेक आव्हाने आहेत. आयपीएलमधील दिग्गज गोलंदाजांविरुद्ध सातत्यपूर्ण कामगिरी करणे आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपली छाप पाडणे हे त्याचे पुढील लक्ष्य असेल. त्याच्या वयामुळे त्याच्यावर अपेक्षांचा दबाव आहे, पण त्याची मानसिक ताकद आणि प्रतिभा त्याला यशस्वी करू शकते.
वैभवच्या यशामागे त्याच्या कुटुंबाचा मोठा वाटा आहे. त्याच्या वडिलांनी सांगितले, “वैभव आता फक्त आमचा नाही, तर संपूर्ण बिहारचा बेटा आहे.” त्याच्या गावातील लोक आणि बिहार क्रिकेट असोसिएशननेही त्याला सातत्याने पाठिंबा दिला आहे.