
पडद्यामागं कोण करतंय काम – रोहित पवार थेट नाव फोडणार…
ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. त्यानंतर पवार कुटुंबात काका – पुतण्याचं पुन्हा मनोमिलन होणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. अशातच ‘ठाकरे कुटुंब एकत्र आले, तर स्वागतच.
पण पवार कुटुंबही एक असल्याचे मत ठामपणे आमदार रोहित पवारांनी व्यक्त केले. तसंच, ‘पवार कुटुंब एकत्र न येण्यासाठी ज्या कुणाचे प्रयत्न सुरू आहेत, त्याचे नाव लवकरच उघड करू.’, असं देखील रोहित पवारांनी सांगितले. त्यांनी केलेल्या या इशारावजा टिप्पणीमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.
साहेब आणि दादा ठरवतील
पवार कुटुंब एकत्र येणार का? या प्रश्नावर उत्तर देताना रोहित पवार म्हणाले, ‘संस्कारात कुटुंब म्हणून एकत्र राहणं महत्त्वाचं आहे. पण काही प्रवृत्ती फक्त स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी कुटुंबं फोडण्याचं काम करत असतात. अशा प्रवृत्तीविरोधात लढणं, हीच खरी शिकवण आहे,’ असं ठामपणे सांगत रोहित पवारांनी अप्रत्यक्षपणे निशाणा साधला.
तसेच ‘पवार कुटुंबाचं राजकीय एकत्रीकरण ही जनतेची भावना असली तरी, ‘साहेब आणि दादा’ जोपर्यंत निर्णय घेत नाहीत, तोपर्यंत कुणाच्याही इच्छा फोल ठरणारच’, असं रोहित पवार यांनी स्पष्ट केलं.
आज नाही, पण एक दिवस नाव घेईन
‘कुटुंब एकत्र येऊ नये यासाठी कुणीतरी काम करतंय का?’ या प्रश्नावर उत्तर देताना रोहित पवारांनी अत्यंत सूचक प्रतिक्रिया दिली. त्यांनी म्हटलं, “आज नाही, पण एक दिवस मी नाव घेईन!” अशी इशारावजा टिप्पणी रोहित पवार यांनी केली. पवार यांनी दिलेल्या सूचक प्रतिक्रियेमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.