
दिल्ली : वादग्रस्त सनदी अधिकारी पूजा खेडकरवर अनेकवेळा यूपीएससी परीक्षा दिल्याचा आरोप आहे. या आरोपाप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पूजा खेडकर फरार झाली होती. त्यानंतर तिला अटकेपासून संरक्षण मिळाले होते.
मात्र पूजा खेडेकरच्या अटकपूर्व जामिनावरील सुनावणीदरम्यान न्यायालयाने चौकशीचे आदेश दिले होते. त्यामुळे आज 9 महिन्यानंतर पूजा खेडकर चौकशीसाठी दिल्ली पोलिसांकडे हजर झाली होती. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना पूजा खेडकर हिने नाव बदलून 12 वेळा यूपीएससी परीक्षा दिल्याच्या आरोपावर स्पष्टीकरण दिले आहे.
माध्यमांशी संवाद साधताना पूजा खेडकर म्हणाली की, मी तपास यंत्रणेला मदत करायला तयार आहे. दरवेळी मी सर्वोच्च न्यायालयात तसं प्रतिज्ञापत्र सादर करून सांगितलं आहे की, मी पोलीस आणि न्यायालयाला पूर्ण सहकार्य करेन. तसेच क्राईम ब्रँचलाही मी मेल केला आहे. चौकशीसाठी मला फोन करा, मी चौकशीसाठी तयार आहे. सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केल्यानंतर न्यायालयाने माझा जबाब नोंदवण्याचे आदेश दिले होते, त्यानुसार मी आज जबाब नोंदविण्यासाठी चौकशीला हजर झाले, असे पूजा खेडकर हिने सांगितले.
नाव बदलून परिक्षा दिल्याच्या आरोपावर बोलताना पूजा खेडकर म्हणाली की, हा आरोप खोटा आहे. माझं नाव पूजा खेडकरच आहे आणि याच नावाने मी परिक्षा दिली आहे. परंतु माध्यमांना आणि सरकारी अधिकाऱ्यांना चुकीची माहिती दिली गेली आहे. माझ्याबद्दल चुकीची माहिती पसरवली जात आहे, असे म्हणत पूजा खेडकर यांनी आईचे नाव लावणे हा कधीपासून गुन्हा झाला? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. पूजा खेडकर यांनी असेही म्हटले की, स्वतः मुख्यमंत्र्यांनी देखील त्यांच्या नावात आईचे नाव लावले आहे. मग मी माझ्या नावात आईच्या नावाचा समावेश केला तर तो गुन्हा झाला का? असा प्रश्नही पूजा खेडकर हिने उपस्थित केला.
खोट्या प्रमाणपत्राच्या आरोपावर बोलताना पूजा खेडकर म्हणाली की, तुम्ही कुठेही गेलात तर तुमचे पहिले आणि शेवटचे नावच सांगणार. त्याचप्रमाणे मी देखील सर्व ठिकाणी माझे नाव पूजा खेडेकर असेच लिहिते. जिथे पूर्ण नाव लिहायचे असते, तिथे मी पूजा दिलीप खेडकर असे लिहिते. महाराष्ट्रात एखाद्याचे नाव दिलीप असेल तर त्याचे नाव दिलीपराव देखील लिहिले जाते. याचा अर्थ ती दोन वेगवेगळी माणसं नसतात. परंतु माझ्यावर खोटे दिव्यांग प्रमाणपत्र आणि अनेक वेळा परिक्षा दिल्याचा आरोप केला जात आहे. मात्र, या सगळ्या गोष्टी तपासायला यूपीएससीचे स्वतंत्र पथक असते. ज्यात १० पेक्षा जास्त डॉक्टरांचे पथक त्यांच्याकडे आहे. त्या सर्वांनी प्रत्येक गोष्ट बारकाईने तपासलेली असते, असे स्पष्टीकरण पूजा खेडकर हिने दिले.