
ठाकरे गटातून प्रवेश करणाऱ्या केपींना अजित पवारांचा सल्ला…
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख अजित पवार हे कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. चंदगड विधानसभा मतदारसंघात अजित पवारांचा नागरी सत्कार होता, त्याचवेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माजी आमदार आणि सध्या शिवसेना ठाकरे गटात असलेले के पी पाटील यांनी भेट घेतली.
के पी पाटील हे पुन्हा एकदा अजितदादा यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करणार हे जवळपास निश्चित झालं आहे. केवळ के पी पाटील यांच्या प्रवेशाची तारीख निश्चित करणे बाकी आहे. मात्र, आज अजित पवार यांनी के पी पाटील यांची चांगलीच कान उघाडणी केली. के पी तुम्ही आता कुठेतरी थांबायला पाहिजे, 2029 सालच्या विधानसभा निवडणुकीपर्यंत तुम्ही 84 वर्षाचे होणार आहात. त्यामुळे, आता रिटायरमेंट घ्या आणि नवं नेतृत्व तयार करा, असा सल्ला अजित पवारांनी दिला.
अजित पवार यांनी के पी पाटील यांना सल्ला देत असतानाच मेहुण्या-पाहुण्यांमधील वादावर नजर टाकली. तुम्ही दोघेही भांडत बसता याला काही अर्थ नाही. कुणीतरी माघारी घेतलं असतं तर आज चित्र वेगळं दिसलं असतं. मात्र, तसं न करता वाद घालत बसता, असेही अजित पवार यांनी म्हटले. विशेष म्हणजे अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची वेगळी चूल मांडताना शरद पवारांच्या वयाचा मुद्दा उपस्थित केला होता. कुटुंब प्रमुखांनी कुठतरी थांबलं पाहिजे, नव्यांना संधी दिली पाहिजे असे अजित पवारांनी म्हटलं होतं. आज, कोल्हापूर दौऱ्यावर केपी पाटील यांच्या पक्षप्रवेशावेळीही अजित पवारांनी तीच भूमिका परखडपणे बोलून दाखवली.
के पी पाटील पुन्हा पक्ष बदलणार ?
माजी आमदार के पी पाटील हे मूळचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे, मात्र पक्षांमध्ये फूट पडल्यानंतर अजितदादा यांना केपी यांनी शुभेच्छा दिल्या… त्यानंतर काही दिवसातच शरद पवार कोल्हापूर दौऱ्यावर आले…त्यावेळी के पी पाटील यांनी त्यांचे देखील स्वागत केले… तुम्ही नेमके कोणत्या गटाचे आहात हे विचारतात मी पवार गटाचा असल्याचे उत्तर के पी यांनी दिले होते… त्यानंतर विधानसभा निवडणुकीत राधानगरी भुदरगडची जागा महायुतीकडून शिवसेना शिंदे गटाला गेली… त्यामुळे के पी पाटील यांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटामध्ये प्रवेश केला आणि निवडणुकीला उभा राहीले… इतकच नाही तर उद्धव ठाकरे यांनी राज्यातील पहिली सभा के पी पाटील यांच्यासाठी घेतली होती… तेच के पी आता पुन्हा एकदा अजित पवार गटामध्ये जाणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे…
जिल्हा बँकेमध्ये मी थांबलो आणि चिरंजिवाला संधी दिली- के पी पाटील
अजितदादा के पी पाटील यांना रिटायर होण्यासंदर्भातल्या सल्ला देत होते. हे सगळं इतरांना झेपले पाहिजे, त्यामुळे मी उभा राहतो. मात्र, जिल्हा बँकेमध्ये मी थांबलो आणि चिरंजिवाला संधी दिली आहे. असं स्पष्टीकरण के पी पाटील यांनी अजितदादांना दिलं. मी आणि मुश्रीफ साहेबांनी त्यांना उभारी दिली, असेही के पी पाटील यांनी म्हटले. ए वाय पाटील यांना मी आणि मुश्रीफ साहेब यांनीच उभारी दिली आहे. आत्तापर्यंतच्या राजकीय प्रवासात आम्ही दोघांनी त्यांना मोठे केलं आहे. कोल्हापूर जिल्हा बँक असो किंवा बिद्री सहकारी साखर कारखाना असो त्या ठिकाणी आम्हीच ए वाय पाटील यांना संधी दिली आहे. महत्वाची पद आमच्या माध्यमातूनच दिली आहेत, असेही केपींनी म्हटलं.