
दैनिक चालू वार्ता वैजापूर प्रतिनिधी -भारत सोनवणे
वैजापूर :-महाराष्ट्र राज्य कृषी सहायक संघटनेने त्यांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलनाचा मार्ग अवलंबला आहे. संघटनेने यापूर्वी कृषीमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन पाळले न गेल्याने वैजापूर येथील कृषी सहाय्यक संघटनेतर्फे आंदोलन सुरू केले आहे.
प्रमुख मागण्या
कृषी सेवक कालावधी रद्द करून कृषी सेवकांना नियमित कृषी सहायक पदावर नियुक्त करावे.
कृषी सहायकांचे पदनाम बदलून सहाय्यक कृषी अधिकारी करावे.
डिजिटल कामकाजासाठी कृषी सहायकांना लॅपटॉप उपलब्ध करून द्यावेत.
ग्रामस्तरावर कामकाजासाठी कृषी मदतनीसांची नेमणूक करावी.
निविष्ठा वाटपासाठी वाहतूक भाडे किंवा परमिटची तरतूद करावी.
कृषी पर्यवेक्षकांची पदसंख्या वाढवून पदोन्नतीमधील अडथळे दूर करावे.
पोखरा योजनेतील रिक्त पदे पूर्ववत भरावी.
मनरेगा योजनेंतर्गत लक्षांक निश्चित करताना अडचणींचा विचार करावा.
नैसर्गिक आपत्तीच्या पंचनाम्यात विविध विभागांची भूमिका स्पष्ट करावी.
सिल्लोड येथील आत्महत्या प्रकरणातील दोषींवर कारवाई करावी.
आंदोलनाची पुढील दिशा ५ मे: कृषी सहायकांनी राज्यभर काळ्या फिती लावून कामकाज केले. ६ मे: सर्व शासकीय व्हॉट्सॲप ग्रुपमधून कृषी सहायक बाहेर पडले. ७ मे राज्यभरातील तालुका कृषी अधिकारी कार्यालयांसमोर कृषी सहायकांचे धरणे आंदोलन सुरू आहे. ८ मे कृषी सहायक सामूहिक रजेवर. १५ मे पर्यंत मागण्यांची सोडवणूक न झाल्यास, बेमुदत काम बंद आंदोलनाचा इशारा संघटनेने दिला आहे. वैजापूर येथील कृषी सहाय्यक संघटनेतर्फे तालुका कृषी अधिकारी वैजापूर यांना याबाबत निवेदन देण्यात आले आहे. शासनाने त्वरित दखल घेऊन मागण्या मान्य कराव्यात, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्धार कृषी सहायक संघटनेने व्यक्त केला आहे. खरीप हंगामाच्या तोंडावर कृषी सहायकांनी असहकार आंदोलन पुकारल्याने कृषी विभागाच्या कामावर परिणाम होण्याची शक्यता आहे. तसेच कृषी पर्यवेक्षक संघटनेचे अध्यक्ष वैजापूर यांनीही कृषी सहाय्यक संघटनेच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवले आहे. यावेळी कृषी संघटनेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष,सचिव व सर्व सदस्य उपस्थित होते.