
ऑपरेशन सिंदूर यशस्वी झाल्यानंतर पाकिस्तानविषयी प्रेम दाखवत स्टेटस ठेवणाऱ्या तरुणाला रत्नगिरीकरांनी चोप दिला. यात जखमी झाल्याने त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.
त्याच्यावर शहर पोलिस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.
तसेच तो ज्या आस्थापनेत कामाला होता तेथून त्याला काढून टाकण्यात आले आहे. महम्मद बद्रुद्दीन परकार (वय २१, मूळ केजीएम प्लाझा, गोवळकोट, चिपळूण, सध्या रा. महादेव नगर, रत्नागिरी) असे या संशयित तरुणाचे नाव आहे.
ही घटना बुधवारी (ता. ७) रात्री निदर्शनास आली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पहलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने हल्ला करत दहशतवाद्यांची नऊ ठिकाणे उद्ध्वस्त केली. यानंतर महम्मद याने ‘पाकिस्तान जिंदाबाद, ‘पाकिस्तानसाठी प्रार्थना करा’ असे स्टेटस संत्याच्या इन्स्टाग्राम आणि व्हॉट्स अॅप स्टेटसला ठेवले. यामुळे खळबळ उडाली.
रत्नागिरीकरांच्या ही गोष्ट लक्षात आली. हा तरुण एका प्रसिद्ध आस्थापनेत काम करतो. त्या आस्थापनेत जाऊन रत्नागिरीकरांनी माहिती घेतली असता, त्याला स्टेटसमुळे आदल्या दिवशीच कामावरून काढून टाकल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर रत्नागिरीकरांनी त्या तरुणाला शोधून चोप दिला. त्यानंतर त्याने ‘भारत माता की जय’ म्हटले.
दंगा काबू पथकाला पाचारण
रत्नागिरीकरांनी चोप दिल्यानंतर जखमी अवस्थेत तरुणाला पोलिसांनी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस प्रशासनाने दंगा काबू पथकाला पाचारण केले होते. या पथकाने जिल्हा शासकीय रुग्णालयाचा ताबा घेतला. शहर पोलिस निरीक्षक शिवरेकर यांच्यासह पोलिस पथकही याठिकाणी दाखल झाले होते.