
दैनिक चालु वार्ता पुणे प्रतिनिधी : अनिल पाटणकर
पुणे : येथील भारती मध्यवर्ती सहकारी ग्राहक भांडार लि.पुणे या संस्थेची सन २०२५-२०३० या कालावधीसाठी नवनिर्वाचित संचालक मंडळ निवडणूक नुकतीच पार पाडली. संचालक मंडळाची प्रथम सभा निवडणूक निर्णय अधिकारी व सहनिबंधक पुणे शहर निलम पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली भारती मध्यवर्ती सहकारी ग्राहक भांडाराच्या सभागृहात घेण्यात आली. नवनिर्वाचित संचालक मंडळाने सर्वानुमते विजयमाला पतंगराव कदम यांची अध्यक्षपदी तर डॉ. भागवतराव निवृत्ती पवार यांची उपाध्यक्षपदी निवड केली. विजयमाला पतंगराव कदम यांनी १९८५ पासून संचालक म्हणून कार्यरत असल्यापासून संस्थेच्या व्यवसाय वाढीचे शिवधनुष्य उचलून संस्थेस यशोशिखरावर पोहचविले. सुरुवातीस काही लाखात वार्षिक उलाढाल होती ती आजमितीस ६० कोटींच्या व्यवहारापर्यंत पोचली आहे. संस्थेने केलेली वाटचाल ही कदम यांच्या कृतीशिल सहभागाची पावती आहे.
दहा शाखांचा विस्तार, बझारची आधुनिक मांडणी, होलसेल विभागाची पुर्नरचना, ग्राहक जोड योजना, गृहिणी महिला योजना, विद्यार्थी योजना, विविध प्रकारचे वार्षिक धान्य महोत्सव, महिलांना प्राधान्य देणारे हळदी कुंकू सारखे सांस्कृतिक कार्यक्रम, महिला प्रोत्साहन योजना, कर्मचारी प्रोत्साहन उपक्रम इत्यादी संकल्पनांमधून ग्राहकांना दर्जेदार सेवा देण्यासाठी विजयमाला नेहमीच आग्रही राहिल्या आहेत. त्यांचे कुशल संघटनात्मक प्रशासकीय नेतृत्व, पारदर्शक प्रशासन व्यवस्था, तंत्रस्नेही कर्मचारी व ग्राहक, व्यापारी व शेतकरी यांच्याकरिता खरेदी विक्री संगणकीय कार्यपध्दतीमुळे संस्था यापुढेही प्रगती पथावर राहणार आहे.
याप्रसंगी विजयमाला कदम म्हणाल्या, २ ऑक्टोबर १९७३ रोजी महात्मा गांधी यांच्या जयंती दिनी डॉ.पतंगराव कदम यांनी ज्या उद्देशाने संस्थेची स्थापना केली; त्या उद्दिष्टांच्या पूर्तीसाठी सर्व संचालक मंडळ, सभासद , कर्मचारी व ग्राहक यांच्या सहयोगातून कदम साहेबांचे कार्य व प्रेरक विचार डोळ्यासमोर ठेवून सर्वजण कार्यरत राहून संस्थेचा अधिक उत्कर्ष करू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच संस्थेच्या प्रगतीचा मागोवाही त्यांनी घेतला. यावेळी डॉ.मंदाकिनी पानसरे, वसंतराव माने, डॉ. भागवतराव पवार, नगरसेवक रामचंद्र कदम, कुलदीप गायकवाड व सरव्यवस्थापक जगन्नाथ शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले. कुलपती डॉ.शिवाजीराव कदम, भारती विद्यापीठाचे कार्यवाह आमदार डॉ. विश्वजीत कदम, कुलगुरू डॉ.विवेक सावजी, भारती विद्यापीठ हेल्थ सायन्सेसच्या कार्यकारी संचालिका डॉ. अस्मिता जगताप, भारती विद्यापीठ रविंद्रनाथ टागोर स्कूल ऑफ एक्सलंसच्या अध्यक्ष स्वप्नाली विश्वजीत कदम, सहकार्यवाह डॉ.के.डी.जाधव, डॉ.एम.एस सगरे, व्ही.बी. म्हेत्रे यांनी नूतन अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.