
दैनिक चालु वार्ता डहाणू प्रतिनिधी-सुधीर घाटाळ
डहाणू, २ जुलै २०२५, डहाणू तालुक्यातील चारोटी या गावातील विजय लाडवींचे घर सतत चालणाऱ्या पावसामुळे पूर्णपणे कोसळले आहे. घरातील सर्व साहित्य भिजून गेले असून त्यांचा संपूर्ण संसार उघड्यावर आला आहे. अगदी जेवणासाठी देखील पंचायत निर्माण झाली आहे. विजय लाडवी यांच्या कुटुंबामध्ये त्यांची पत्नी आणि लहान चार मुले असून, त्यांच्या आर्थिक परिस्थितीची बाब अतिशय बेताची आहे.या गंभीर संकटकालीन परिस्थितीतून सावरण्यास मदतीची आवश्यकता भासत असताना, स्थानिक ग्रुप सदस्यांनी यारी दोस्ती ग्रुपला या दुखद परिस्थितीची माहिती पोहोचवली. तत्काळ, यारी दोस्ती ग्रुपच्या सर्व सदस्य-मित्रांनी एकत्र येऊन निधी गोळा केला आणि धाव घेतली.ग्रुपने त्यांना घरासाठी आवश्यक असणाऱ्या जीवनावश्यक वस्तू म्हणून किराणा किट, मुलांसाठी शैक्षणिक साहित्य, ताडपत्री, छत्री यासारख्या वस्तू तत्काळ उपलब्ध करून दिल्या. या छोट्या मदतीमुळे विजय लाडवींच्या कुटुंबाला बहुमोल आधार मिळाला असून, कुटुंबातील सर्वजण यारी दोस्ती ग्रुपचे मदतीसाठी दिलेल्या योगदानाबद्दल मनापासून आभार मानत आहेत.निस्वार्थ भावनेने समाजसेवा करण्याचा आदर्श यारी दोस्ती ग्रुपचा उद्देश हा गरजूंना मदत करणे, खेडोपाड्यात शैक्षणिक उपक्रम राबवणे, रक्तदान करणे आणि युवा मार्गदर्शन यांसारख्या विविध सामाजिक उपक्रमांद्वारे समाजाला उजळवणे हा आहे. ग्रुपचे सर्व सदस्य समजतात की समाज कार्यासाठी श्रीमंत किंवा मोठ्या संसाधनांची गरज नसते; त्यासाठी फक्त आपले मन मोठे असणे पुरेसे आहे.यारी दोस्ती ग्रुप पालघरमधील सदस्य निस्वार्थ भावनेने आणि एकत्रित प्रयत्नांनी अशा कठीण प्रसंगात गरजूंना मदतीचा हात देत आहेत. या कार्याचे कौतुक स्थानिक स्तरावरच नव्हे तर सर्वत्र होत असल्याचे दिसून येत आहे.