
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी वाशिम/रिसोड – भागवत घुगे
:
वाशिम जिल्ह्यातील
हवामान विभागाचे सर्व अंदाज चुकीचे ठरविण्याचा चंग यावर्षी पावसाने बांधला असल्याचे दिसत आहे. जिल्ह्यात गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी २७ टक्के पावसाची घट दाखविण्यात येत आहे. दररोज आकाशात दाटून येणारे ढग पाऊस न पडताच निघून जात असल्याने शेतकरी आशा-निराशेच्या हिंदोळ्यावर झुलताना दिसत आहेत. जिल्ह्यावर कोरड्या आभाळ मायेने शेतकरी धास्तावला असतानाच कोवळी पिकेही मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत दिसत आहे.
वाशिम जिल्ह्यात ४ लाख ५१ हजार हेक्टर खरिपाच्या क्षेत्रापैकी जवळपास साडेचार लाख हेक्टरवर खरिपाची पेरणी
झाली आहे. सुमारे ७० टक्के हेक्टरवर खरिपाची पेरणी होउन शेतात कोवळी पिके डौलत आहेत. गेल्या पंधरा दिवसांपासून मोठे पाऊस पडलेले नसल्यामुळे रिमझिम पावसावरच कोवळी पिके तग धरून आहेत.
अनेक शेतकऱ्यांनी जूनच्या पहिल्या आठवड्यात पेरणी केल्यानंतर पाऊस न पडल्याने त्यांना दुबार पेरणी करावी लागली होती. दुबार पेरणी केलेली कोवळी पिके उगवून आल्यानंतर पुन्हा पावसाने दडी मारल्याने शेतकरी धास्तावले आहेत.
हवामान विभागाने वाशिम जिल्ह्याला ३० जून ते ७ जुलैपर्यंत यलो अलर्टचा इशारा जारी केल्यानंतर गेल्या दोन दिवसांपासून आभाळ ढगांनी भरून येउन केवळ हलका पाऊस पडत असल्याने या पावसावर पिके जगणे अवघड झाले आहे. जिल्ह्यात रिसोड व मालेगाव दोन तालुके वगळता तुलनेने जिल्ह्यातील सहा तालुक्यांत पावसाचे प्रमाण कमी असल्याचे दिसत आहे.
१ मि.मी. पाऊस
वाशिम जिल्ह्याची वार्षिक सरासरी ६०३ मिमी असून १ जुलैपर्यंत जिल्ह्यात ११५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. गेल्या चोवीस तासांत जिल्ह्यात केवळ १.२० मिमी पावसाची नोंद झाली आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून पिकायोग्य पाऊस न पडल्याने शेतकरी चांगल्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.