
दैनिक चालु वार्ता डहाणू प्रतिनिधी-सुधीर घाटाळ
डहाणू, ४ जुलै २०२५,कासा ग्रामपंचायतीतील गटारसफाई व कचरा व्यवस्थापनाच्या दुर्लक्षावर “चालू वार्ता”ने वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर
प्रशासन आणि ग्रामपंचायतीने तातडीने हालचाली सुरू केल्या आहेत. गावातील कचरा उचलण्याचे काम हाती घेण्यात आले असून, गटारसफाई मोहीम राबवली जात आहे. यासोबतच प्लास्टिकविरोधी जनजागृतीही सुरू करण्यात आली आहे.पावसाळ्याच्या सुरुवातीला कासा गावातील गटारी तुंबल्यामुळे पावसाचे पाणी घराघरात घुसले होते. कचऱ्याचे ढीग व सांडपाण्यामुळे दुर्गंधी आणि आजारांचा धोका वाढला होता. “चालू वार्ता”ने दिनांक २४ जून रोजी यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध करताच ग्रामपंचायतीने स्वच्छता कर्मचाऱ्यांना कार्यावर लावले. गावातील मुख्य चौक, भाजीपाला बाजार, बसस्थानक परिसरात कचरा उचलण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
“गावात स्वच्छतेसाठी विशेष मोहिम राबवली जात आहे. परिसरात ‘प्लास्टिक मुक्त गाव’ आणि ‘स्वच्छता ही सेवा’ अशा घोषणा स्पीकरवरून प्रसारित केल्या जात आहेत. सर्व दुकानदारांना कचरा एकाच ठिकाणी गोळा करून ठेवण्याचे आदेश दिले असून, डम्पिंग खड्ड्यात तो व्यवस्थितपणे जमा करण्यात येत आहे. नागरिकांचा प्रतिसाद चांगला असून लवकरच गावात सकारात्मक बदल दिसून येईल.”
दिघा, ग्रामविकास अधिकारी – कासा ग्रामपंचायत