
दैनिक चालु वार्ता पैठण प्रतिनिधी-तुषार नाटकर
छ. संभाजीनगर (पैठण) : शहरातील श्रीलक्ष्मी ट्रेडर्स किराणा दुकानासह इतर दोन दुकानांमध्ये अज्ञात चोरट्यांनी धाडसी चोरी करून एकूण पस्तीस हजाराची रोकड लंपास केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी पैठण पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 241/2025 अन्वये कलम 334(1) भारतीय न्याय संहिता अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना दि. 5 जुलै शनिवारी रोजी रात्री दहा वाजेपासून ते सहा जुलैच्या सकाळी साडे सहा दरम्यान घडली. राजेश रमेशराव शिंदे (वय 38, व्यवसाय किराणा दुकान, इंदिरानगर, पैठण) यांनी याबाबत फिर्याद दाखल केली आहे.
घटनास्थळी श्रीलक्ष्मी ट्रेडर्स हे त्यांचे दुकान असून, चोरट्यांनी दुकानाचे पत्रे कापून प्रवेश केला. याच परिसरातील अमित अशोक शहाणे यांच्या कपड्याच्या दुकानातून 25000 व अनिल प्रल्हाद ढगे यांच्या दुकानातून 3000 रोख रक्कम चोरी करण्यात आली. फिर्यादीच्या दुकानातून 7000 चोरीला गेले असून एकूण चोरी 35000 इतकी झाली आहे.
तक्रारीवरून गुन्हा नोंदवण्यात आला असून घटना पोलीस स्टेशनपासून उत्तरेस 3 कि.मी अंतरावर घडली.
पैठण पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून, लवकरच आरोपींचा छडा लागेल, असा विश्वास पोलीस प्रशासनाने व्यक्त केला आहे.