
हमास दहशतवाद्यांची हैवानियत पहिल्यांदाच आली समोर !
इस्रायल आणि हमास यांच्यात सध्या भयंकर युद्ध सुरू आहे. 7 ऑक्टोबर 2023 रोजी हमासच्या रक्तरंजित हल्ल्यानंतर सुरू झालेला हा संघर्ष इराणपर्यंत पोहोचला आहे. आतापर्यंत दोन्ही बाजूंनी हजारो लोक आणि सैनिक मारले गेले आहेत.
आता इस्रायलच्या प्रत्यक्षदर्शींनी 7 ऑक्टोबरच्या हल्ल्याबाबत हमासच्या क्रूरतेची कहाणी उघडपणे सांगितली आहे. हमासच्या दहशतवाद्यांनी इस्रायली महिलांवरील अत्याचाराच्या सर्व मर्यादा ओलांडल्या होत्या, असा धक्कादायक खुलासा इस्रायली प्रत्यक्षदर्शींनी केला आहे. 7 ऑक्टोबर रोजी हमासच्या दहशतवाद्यांनी इस्रायली महिलांच्या मृतदेहांवर बलात्कार केला. इतकंच नव्हे तर तरुण मुलींना निर्वस्त्र करून त्यांना झाडांना आणि खांबांना बांधलं होतं. त्यानंतर हमासच्या क्रूर लोकांनी त्यांच्या गुप्तांगात आणि डोक्यात गोळ्या झाडल्या होत्या.
‘द टाइम्स’ या लंडनच्या वृत्तपत्राने त्यांच्या एका तपास अहवालात 7 ऑक्टोबरच्या हल्ल्याबद्दल अनेक खुलासे केले आहेत. या हल्ल्यास हमासने 1200 इस्रायली लोकांना मारलं होतं. एका साक्षीत प्रत्यक्षदर्शीने सांगितलं की, हमासने किमान सहा वेगवेगळ्या ठिकाणी बलात्कार, सामूहिक बलात्कार केले आहेत. याबद्दलची संपूर्ण माहिती 15 सुटका झालेल्या इस्रायली ओलिसांनी, बलात्कारातून वाचलेल्या एका महिलेनं आणि 17 प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे. इस्रायलच्या कायदेतज्ज्ञांनी पीडितांकडून हमासच्या क्रूरतेबद्दलची माहिती घेतली आहे. बलात्कारानंतर पीडित महिलांना हमासने तिथेच मरण्यासाठी सोडलं होतं, असाही खुलासा प्रत्यक्षदर्शींनी केला.
या अहवालाचे सहलेखक शेरोन जग्गी म्हणाले, “हमासने अनेक पीडितांना गोळ्या घातल्या आणि त्यांच्या मृतदेहांवर बलात्कार केला, असं अनेक साक्षीदारांनी सांगितलं. हमासने लैंगिक हिंसाचाराचा वापर एक धोरणात्मक शस्त्र म्हणून केला. आयसिस आणि बोको हरामच्या दहशतवाद्यांनीही अशाच पद्धती वापरल्या होत्या. अनेक पीडित निर्वस्त्र आणि फाटक्या-तुटक्या कपड्यांमध्ये आढळले होते. त्यांचे हात बांधलेले होते. हत्येनंतर सामूहिक बलात्काराचेही पुरावे मिळाले होते.
दरम्यान इस्रायली सैन्याची हमासशी लढाई सुरूच आहे. इस्रायली सैन्याने मंगळवारी सांगितलं की, उत्तर गाझामध्ये गस्तीदरम्यान स्फोटकांचा स्फोट होऊन त्यांचे पाच सैनिक ठार झाले आणि दोन जण गंभीर जखमी झाले. तर गाझामधील आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितलं की, दोन वेगवेगळ्या ठिकाणी इस्रायली हवाई हल्ल्यात 18 जणांचा मृत्यू झाला आहे. जखमींना वाचवण्यासाठी पाठवलेल्या अतिरिक्त सैन्यावरही दहशतवाद्यांनी गोळीबार केल्याचं वृत्त माध्यमांनी दिलं आहे. गेल्या 21 महिन्यांपासून गाझामध्ये सुरू असलेला संघर्ष थांबवण्यासाठी इस्रायल आणि हमास अमेरिकेच्या मध्यस्थीने युद्धवबंदी प्रस्तावावर विचार करत असतानाच हा हिंसाचार घडला आहे.