
ठाकरेंचे आझाद मैदानातून फटकारे…
गिरणी कामगार आणि गिरण्यांचा इतिहास हे आता उरावर बसलेल्या सत्ताधाऱ्यांना माहिती नाही. सत्ताधाऱ्यांना मुंबई कशी लुटायची हे माहिती आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत गिरणी कामगारांनी रक्त सांडले नसते, तर राज्यकर्त्यांना त्यांच्या बुडाखाली खुर्ची दिसली नसती.
आमच्या डोळ्यांदेखत मुंबई तोडली जात असेल, मराठी माणूस भरडला जात असेल तर आम्ही दोघे बंधू भांडत बसू? आम्ही भांडणे मिटवून टाकली. जो-जो मराठी माणसांच्या मुळावर येईल त्याला मुळासकट उखडून टाकण्यासाठी आम्ही एकत्र आलोय, असे शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हणत महायुतीवर हल्लाबोल केला आहे.
आझाद मैदान येथे गिरणी कामगार आंदोलनासाठी बसले आहेत. त्यांच्या आंदोलनाला उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे ( शरदचंद्र पवार ) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार अरविंद सावंत, आमदार जितेंद्र आव्हाड, आमदार आदित्य ठाकरे आणि अन्य नेत्यांनी भेट दिली. तेव्हा उद्धव ठाकरे बोलत होते.
सत्ताधाऱ्यांना मुंबई कशी लुटायची हे माहिती
उद्धव ठाकरे म्हणाले, “चार दिवसांपूर्वी कृती समितीचे शिष्टमंडळ माझ्याकडे आले होते. मला सांगण्यात आले, ९ जुलैला सगळे गिरणी कामगार आंदोलनासाठी बसतोय. शिवसेनेचा पाठिंबा पाहिजे. मी म्हटलं, शिवसेनेचा पाठिंबा मागण्याची गरज नाही. शिवसेना तुमच्यासोबतच आहे. सोबतच राहणार आहे. गिरणी कामगार आणि गिरण्यांचा इतिहास हे आता उरावर बसलेल्या सत्ताधाऱ्यांना माहिती नाही. सत्ताधाऱ्यांना मुंबई कशी लुटायची हे माहिती आहे. मुंबईसाठी रक्त सांडण्याची हिंमत सत्ताधाऱ्यांत नाही.”
मुंबई ही सोन्याचं अंड देणारी कोंबडी
संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत गिरणी कामगारांनी रक्त सांडले नसते, तर राज्यकर्त्यांना त्यांच्या बुडाखाली खुर्ची दिसली नसती. तेव्हाही मुंबईवर अधिकार सांगितला जात होता. पण, मराठी माणूस रस्त्यावर उतरला आणि तेव्हाचे केंद्रातील सरकारला गुडघ्यावर आणून आपली मुंबई राखली आहे. त्याच मुंबईत परत एकदा दिल्लीतील मालकाचे नोकर सत्तेवर बसले आहेत. ही लोक गिरणी कामगार आणि मराठी लोकांना मुंबईबाहेर काढण्यास अतूरला आहे. जग जिंकलं तरी चालेल पण त्यांना मुंबई पाहिजे. सत्ताधाऱ्यांमते मुंबई ही सोन्याचं अंड देणारी कोंबडी आहे. ही कोंबडी कापायला निघाले आहेत. ”
राज्यकर्त्यांना आम्ही इथेच राजकारणात गाडणार आणि ठेचणार
“मराठी माणसांत आग लावली जात आहे. मराठी-अमराठी भेद केला जात आहे. भेदाभेद करून आपल्या पोळ्या भाजल्या जात आहेत. शिवसेनेमुळे मराठी माणूस मुंबईबाहेर गेल्याचा आरोप केला जातो. पण, मराठी माणूस मुंबईतच आहे. या राज्यकर्त्यांना आम्ही इथेच राजकारणात गाडणार आणि ठेचणार आहोत,” असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.
धारावीला अदानींच्या घशात घातले
“आपण धारावीचा लढा लढत आहोत. विकासाच्या नावाखाली धारावीकरांना अपात्र ठरवून बाहेर काढले जात आहे. धारावीकडे कुणाचेही लक्ष नव्हते. पण, आता धारावीला अदानींच्या घशात घातले आहे. देवनार डंपिग ग्राऊंड, मीठागर, मदर डेअरी अशा जागा सुद्धा अदानींच्या घशात घातली जात आहे,” असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला आहे.
गिरणी कामगारांना धारावी कुर्ला येथे जागा द्या
“गिरणी कामगारांची ही दुसरी किंवा तिसरी पिढी आहे. गिरणी कामगारांच्या संपावेळी त्यांना उद्ध्वस्त करण्यात आले. जमिनी गिरणी मालकांच्या घशात घालून तिथे टॉवर उभे करण्यात आले. ज्यांनी मुंबई मिळवून दिली, त्यांना मुंबईबाहेर पाठवत आहात. मात्र, गिरणी कामगारांना धारावी कुर्ला येथे जागा द्या,” अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली.
मराठी माणसांच्या मुळावर येणाऱ्यांना उखडून टाकण्यासाठी बंधू एकत्र
“गिरणी कामगार, पोलीस आणि सफाई कर्मचाऱ्यांना मुंबईत हक्काची जागा दिलीच पाहिजे, अशी मागणी होती. दुर्दैवाने आपलं सरकार आले नाही. ते असते तर गिरणी कामगारांना मोर्चा काढण्याची वेळ आली नसती. मात्र, फोडा-फोडी केली जाते. आता सगळ्यांच्या मनात होते, ते आम्ही दोघे बंधू एकत्र आलो. आम्हीही राजकीय पोळ्या भाजत बसलो असतो. परंतु, आम्ही प्रबोधनकार ठाकरे यांचे नातू आहोत. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात प्रबोधनकार ठाकरे, बाळासाहेब ठाकरे आणि श्रीकांत ठाकरे हे होते. आमच्या डोळ्यांदेखत मुंबई तोडली जात असेल, मराठी माणूस भरडला जात असेल तर आम्ही दोघे बंधू भांडत बसू? आम्ही भांडणे मिटवून टाकली. जो-जो मराठी माणसांच्या मुळावर येईल त्याला मुळासकट उखडून टाकण्यासाठी आम्ही एकत्र आलोय,” असेही उद्धव ठाकरे यांनी म्हटले.