
बैठकीत निर्णय; उदय सामंतांचा उद्धव ठाकरेंना टोला !
गिरणी कामगारांच्या मुंबईतील घरासंदर्भात कामगारांच्या विविध संघटनांची आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमवेत बैठक झाली. या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले असून शेलू, वांगणी येथे घर न देता मुंबईतच घर देण्यासंदर्भाने विचार करण्यात आला आहे.
तसेच, शेलू, वांगणी येथील घर नाकारणाऱ्यांना घर देणार नाही, अशी शासनाच्या जीआरमधील अट देखील रद्द करण्यात आली. याबाबत, आमदार सचिन अहिर (Sachin ahir) यांनी माहिती दिली. तसेच, मंत्री उदय सामंत (Uday samant) यांनीही बैठकीचा वृत्तांत सांगितला, यावेळी नाव न घेता त्यांनी शिवसेना उबाठा प्रमुख उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं.
गिरणी कामगार हे काल प्रचंड मोठ्या प्रमाणात राणीच्या बागेपासून जमा होणार होते. मात्र, शासनाने परवानगी नाकारल्यामुळे सर्वजण आझाद मैदानात जमा झाले. गिरणी कामगारांचा मोठा मोर्चा आझाद मैदानावर काढण्यात आला होता. या मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी उद्धव ठाकरे, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, शशिकांत शिंदे, भाई जगताप आझाद मैदानात आले होते. सरकारला एमएमआरच्या नावाखाली आम्हाला मुंबईबाहेर पाठवायचे होते. ज्यांना घरे घ्यायची आहेत, त्यांनाच बाहेर पाठवायचे आहे. मात्र, आज आम्ही सर्व संघटना एकत्र येऊन आमची मागणी मांडली. घर घेतले नाही तर घर जाणार असा शासनाचा जीआर होता, तो बदलून टाकला. तसेच, ज्यांना फॉर्म भरता आला नाही त्यांच्याबाबतही चर्चा झाली. उपमुख्यंत्री यांच्या उपस्थितीमध्ये बैठक पार पडली, इतर मंत्री आणि संघटनेचे लोक होते, अशी माहिती आमदार व गिरणी कामगार संघटनेचे नेते सचिन अहिर यांनी दिली.
मुंबईतच घर देण्याबाबतच प्रस्ताव
सरकारने याबाबत शेलू आणि वांगणीत घर नको असेल तर घर नाही अशी जीआरमधील जाचक अटी कमी कण्याचे आश्वासन दिले आहे. गिरणी कामगारांना मुंबईत घर कुठे देणार हा प्रश्न होता, रमाबाई आंबेडकर आणि धारावीसारख्या जागी घर देऊ शकता येते का, तसेच इतर काही मार्ग त्यांना सांगितले आहेत. खारफुटीच्या जमिनीवर घरे बांधता येतील, त्याव्यतिरिक्त एमएमआर रिजनची हद्द पनवेलपर्यंत होती, आता अलिबागला गेली आहे. पण, तसे चालणार नाही, मुंबईतच घर देणार, मुंबई लागत घर देण्याबाबत प्रस्ताव तयार करण्यात येईल, असेही अहिर यांनी म्हटले.
खासगी विकास करणारे असतील तर त्यांना 50 टक्के घरे कामगारांना आणि 50 टक्के एफएसआय देण्यात येईल का? याबाबत विचार आहे. सरकारला आम्ही मार्गदर्शन करू, वेळ पडली तर आम्ही रस्त्यावर उतरू, अशी भूमिका घेऊ.
निश्चितपणे सकारात्मक आहे आणि आशावादी आहोत, पण यावर न राहता अपेक्षित निर्णय झाला पाहिजे, अशी मागणीही सचिन अहिर यांनी केली. तसेच, शासनाचा जी.आर. रद्द केल्यामुळे पुढच्या काळात सक्ती केली तर जाऊ नका आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. शेलू आणि वांगणीत 15 लाखाला घरे देण्यात येत आहेत, तर खासगी ठिकाणी येथे 10 लाखाला घर मिळत आहेत, मग ही सक्ती का? जो अन्यायकारक जी आर होता, तो रद्द करण्यात आम्ही यशस्वी झालो. गिरणी कामगारांच्या एकजुटीचा हा विजय आहे, असे सचिन अहिर यांनी सभागृहात म्हटले.
उदय सामतांचा उद्धव ठाकरेंना टोला
सचिन अहिर यांच्यानंतर मंत्री उदय सामंत यांनी भूमिका मांडली. यावेळी, नाव न घेता उद्धव ठाकरे आणि विरोधकांना त्यांनी लक्ष्य केलं. काल गिरणी कामगारांचा मोर्चा आझाद मैदानात निघाला, त्यात काहींनी राजकीय पोळी भाजायचा प्रयत्न केला. आज ठरल्याप्रमाणे गिरणी कामगारांची एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीतं बैठक झाली. कामगारांच्या तीन चार मागण्या होत्या, त्यापैकी सेलूमध्ये घर नाकारलं तर कुठेही घर देणार नाही असा शेरा शासन निर्णयात होता तो रद्द केला आहे. मुंबई आणि मुंबईलागतं घर हवी ही मागणी होती.
एसआरएच्या माध्यमातून, म्हाडाच्या माध्यमातून जवळपास घर बांधून देता येतील का यावर चर्चा झाल्याचे मंत्री उदय सामंत यांनी सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात घरं देऊन दाखवू, असेही सामंत यांनी ठामपणे सांगितले. तसेच, वेगवेगळ्या जागा देऊन घर बांधून देणार आहोत, काही लोकं नुसतं भाषण करतात, गप्पा मारतात. मात्र, एका बैठकीत एकनाथ शिंदे यांनी सर्व पण, तू, परंतु लांब केल्या आहेत, असे म्हणत सामंत यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.