
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी गंगाखेड-प्रेम सावंत
गंगाखेड:मराठा आरक्षणासाठी गेली दोन वर्षे निःस्वार्थपणे लढा देणारे मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी आज धारासुर येथे आयोजित पारावरच्या चावडी बैठकीत ठाम शब्दांत स्पष्ट केले की, माझ्या शरीरात प्राण असेपर्यंत मी मराठा समाजासाठी ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळवून देणारच.
या बैठकीला गंगाखेड तालुका समन्वयक श्रीकांत भोसले यांच्यासह परिसरातील हजारो मराठा समाज बांधव, माता-भगिनी उपस्थित होत्या. मनोज जरांगे पाटील यांचे गावात अचानक आगमन झाल्याने गावात उत्सुकता आणि हालचाल निर्माण झाली होती. सायंकाळी 7 वाजता बैठक सुरू झाली.
मनोज पाटील पुढे म्हणाले, “सरकारकडून आंदोलनात फूट पाडण्याचे षड्यंत्र सुरू आहे. पण मी मराठा समाजाचं लेकरू म्हणून शेवटपर्यंत ही लढाई प्रामाणिकपणे लढणार आहे. सरकारने ‘सगे सोयरे’ अध्यादेश जरी काढला असला तरी त्याची अंमलबजावणी केली नाही. त्यामुळे हा समाज फसवणुकीचा बळी ठरला आहे.
ते पुढे म्हणाले की, महाराष्ट्रातील प्रत्येक मराठा कुणबी आहे, याचे पुरावे आहेत. त्यानुसार कायद्यात बदल करून ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यावे. अन्यथा 29 ऑगस्ट रोजी मुंबईत होणाऱ्या शेवटच्या लढाईत सरकारला मराठ्यांची ताकद दाखवली जाईल.
धारासुर गावातील सकल मराठा समाज बांधवांनी या बैठकीच्या आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले. परिसरातील जनतेत या बैठकीमुळे नवचैतन्य आणि जोश निर्माण झाला आहे.