दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी मंठा -सुरेश ज्ञा. दवणे
जालना ( मंठा)
तालुक्यातील तळणी जवळील उस्वद येथील शेतकरी वसंत सरोदे यांनी बँकेच्या मनस्तापदायक आणि असंवेदनशील कारभाराला कंटाळून आत्मदहनाचा इशारा दिल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. वेळेवर पीककर्ज मिळवण्यासाठी त्यांनी अनेक वेळा बँकेत पाठपुरावा केला, मात्र बँक मॅनेजरकडून वारंवार टाळाटाळ करण्यात आली. उलट वसंत सरोदे यांच्यावर खोटा गुन्हा दाखल करून त्यांना दडपण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
ही घटना उघडकीस आल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश सोळंके यांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर करत खोटा गुन्हा तात्काळ मागे घेण्याची तसेच संबंधित बँक मॅनेजरवर कठोर फौजदारी कारवाई करण्याची मागणी केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, “शेतकरी हा या देशाचा पोशिंदा आहे, आणि त्याच्यावर अन्याय करणाऱ्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेना कधीच सोडणार नाही. शासन हे जनतेसाठी असते; त्यामुळे अन्याय करणाऱ्यांना वाचविण्याचा कुठलाही प्रयत्न होऊ नये.”
मनसेने यावेळी स्पष्ट मागणी केली की वसंत सरोदे यांच्यावर दाखल खोटा गुन्हा तात्काळ मागे घेतला जावा. संबंधित बँक मॅनेजरवर निलंबित करून फौजदारी स्वरूपात कारवाई केली जावी आणि त्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे. तसेच शेतकऱ्यांच्या तक्रारींसाठी जिल्हास्तरावर स्वतंत्र आणि कार्यक्षम यंत्रणा स्थापन करण्यात यावी.
प्रकाश सोळंके यांनी यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वचन उद्धृत करत सांगितले की, “अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा अधिक दोषी असतो”, आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे विधान “जिथे अन्याय दिसेल, तेथे लात बसलीच पाहिजे” हेही नमूद केले.
या संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल घेऊन संबंधितांवर तात्काळ व ठोस कारवाई करण्यात यावी, अशी मागणी मनसेच्या वतीने करण्यात आली आहे.