
राऊतांचा गौप्यस्फोट !
महाराष्ट्रात पावसाळी अधिवेशन सुरू असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या ‘गुप्त’ दिल्ली दौऱ्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह इतर काही भाजप नेत्यांची भेट घेतल्याचे फोटो समोर आल्यानंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.
राऊतांच्या आरोपांना मंत्री उदय सामंत यांनी प्रत्युत्तर देत त्यांना ‘टाइमपास’ संबोधले आहे.
‘शिंदे यांनी अमित शहांचे चरण धुतले,’ राऊतांचा गंभीर आरोप
संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्यावर भाष्य करताना अनेक गंभीर आरोप केले आहेत. राऊत म्हणाले, दिल्ली दौऱ्यामध्ये एकनाथ शिंदे यांनी त्यांचे गुरु अमित शहांचे चरण धुवून आशीर्वाद घेतले. हे काही मी चेष्टेने किंवा दुसऱ्या कोणत्या अर्थाने बोलत नाही. मी सध्या बोलत आहे ते शंभर टक्के खरं आहे. राऊतांनी पुढे म्हटले, “एकनाथ शिंदे यांचे गुरु दिल्लीत आहेत. ते अमित शहा, नरेंद्र मोदी आहेत. शिंदे हे जे पात्र आहे, जो गट आहे तो यांनी निर्माण केला आहे. त्यांचे आदेश एकनाथ शिंदे यांना पाळावे लागतात.” राऊत इतकेच थांबले नाहीत. त्यांनी शिंदेंनी गुरुपौर्णिमेचे साहित्य सोबत नेऊन अमित शहांची पूजा केली असल्याचा दावाही केला. “त्यांनी गुरुपौर्णिमेचं सगळं सामान त्यांच्यासोबत नेलं होतं. पाय धुण्याचं सामान, फुल, पूजाअर्चा आणि त्यानुसार ते गेले. त्यांनी दिल्लीत त्यांची पूजा चर्चा केली. गुरु म्हणून अमित शहा यांची त्यांनी पूजा केली. गुरु म्हणून त्यांच्या चरणावर डोकं ठेवलं. त्यांच्या पायावर चाफ्याची फुले वाहिली.
त्यांच्या दोन्ही पायांना चंदन लावलं. त्याचे फोटो जरी काढता आले नसले तरी त्याची माझ्याकडे पक्की माहिती आहे,” असे राऊत म्हणाले.
उदय सामंतांचे प्रत्युत्तर: ‘विरोधकांच्या टीकेचा शिंदेंना फरक पडत नाही’
संजय राऊत यांच्या आरोपांवर मंत्री उदय सामंत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. सामंत म्हणाले, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अमित शाह यांना भेटले असतील, तर यांच्या पोटात दुखण्याचे कारण काय आहे? मुख्यमंत्री व्हायला कुवत आणि धमक लागते. सामंत यांनी राऊत यांच्या आरोपांमध्ये काही तथ्य नसल्याचे म्हटले. “एकनाथ शिंदे यांनी उठाव केल्याने त्यांना जखम झाली. विधानसभा निवडणूक जिंकल्यानंतर त्यांची जखम आणखी वाढली. एकनाथ शिंदे यांना वारंवार टीका करून ‘फेक नॅरेटिव्ह’ सेट करण्याचा प्रयत्न सुरू आहे. विरोधकांच्या टीकेचा एकनाथ शिंदे यांना काही फरक पडत नाही, असे सामंत म्हणाले. विरोधकांना टोला लगावताना उदय सामंत म्हणाले की, “एकनाथ शिंदे हे हत्तीसारखे चालतात आणि विरोधक केवळ त्यांच्यावरती भुंकण्याचे काम करतात.” विरोधकांच्या पत्रकार परिषदांवर चर्चा करणे म्हणजे केवळ ‘टाइमपास’ असल्याचेही त्यांनी पुढे म्हटले.
महाराष्ट्रात पावसाळी अधिवेशन सुरू असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या ‘गुप्त’ दिल्ली दौऱ्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह इतर काही भाजप नेत्यांची भेट घेतल्याचे फोटो समोर आल्यानंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. राऊतांच्या आरोपांना मंत्री उदय सामंत यांनी प्रत्युत्तर देत त्यांना ‘टाइमपास’ संबोधले आहे.