
2026 च्या यादीत महाराष्ट्रातील 7 मोठी नावे; राजकारण फिरणार…
बातमीत थोडक्यात काय?
राष्ट्रपतींनी उज्ज्वल निकम यांच्यासह चार प्रतिष्ठित व्यक्तींना राज्यसभेसाठी नामनिर्देशित केलं असून 2026 मध्ये देशभरातील 75 राज्यसभा जागा रिकाम्या होणार आहेत.
या निवृत्तींच्या यादीत मल्लिकार्जून खर्गे, दिग्विजय सिंह, हरदीप पुरी, एच.डी. देवेगौडा, रंजन गोगोई यांसारखी मोठी नावे आहेत.
महाराष्ट्रातील सात सदस्यांचा कार्यकाळ 2 एप्रिल 2026 रोजी संपणार आहे.
संसदेच्या वरिष्ठ सभागृहामध्ये म्हणजेच राज्यसभेसाठी राष्ट्रपतींनी चार प्रतिष्ठित व्यक्तींची नावे नामनिर्देशित केली आहेत. त्यामध्ये महाराष्ट्रातील ज्येष्ठ विधिज्ञ आणि विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांचाही समावेश आहे. पण पुढील वर्षी 2026 मध्ये महाराष्ट्रातील 7 बड्या नेत्यांचा राज्यसभेचा कार्यकाळ संपत आहे. त्यामुळे पुढील वर्षी राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे.
राज्यसभेच्या 245 जागांपैकी 73 जागांची निवडणूक पुढील वर्षी एप्रिल, जून आणि नोव्हेंबर या महिन्यांत होणार आहे. निवृत्त होणाऱ्या सदस्यांमध्ये केंद्रीय मंत्र्यांसह अनेक मोठी नावे आहेत. त्यातील सर्वाधिक मोठं नाव म्हणजे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे. त्यांचा कार्यकाळ 25 जून 2026 रोजी संपत आहे. त्याचप्रमाणे माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा हेही त्यांच्यासोबतच निवृत्त होणार आहेत.
उत्तर प्रदेशातील दोन नावांचाही यात समावेश आहे. मोदी सरकारमधील मंत्री हरदीप सिंह पुरी आणि बी. एल. वर्मा हे 25 नोव्हेंबरला निवृत्त होतील. यूपीतील आणखी आठ सदस्यांचा कार्यकाळही तेव्हाच संपणार आहे. तसेच केंद्रीय मंत्री रवनीत सिंग बिट्टू आणि जॉर्ज कुरियन यांचाही कार्यकाळ पुढील वर्षीच संपत आहे. काँग्रेसमधील आणखी एक मोठे नाव म्हणजे दिग्विजय सिंहही निवृत्त होणार आहेत.
झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन, गुजरातमधील काँग्रेसचे मातब्बल नेते शक्तीसिंह गोहिल, तेलंगणातून काँग्रेसचे नेत अभिषेक मनू सिंघवी, राज्यसभेचे उपसभापती हरिवंश, माजी केंद्रीय मंत्री उपेंद्र कुशवाह, तृणमूल काँग्रेसचे साकेत गोखले, लोकसभेचे माजी उपसभापती थंबी दुराई, तिरुची शिवा आदी नेतेही निवृत्तीच्या उंबरठ्यावर आहे. राष्ट्रपती नामनिर्देशित कोट्यातूनही एक महत्वाचे सदस्य निवृत्त होत आहेत. माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांचा कार्यकाळ मार्च महिन्यात संपत आहे.
महाराष्ट्रातून कोण?
महाराष्ट्रातील एकूण सात सदस्यांचा 2 एप्रिलला कार्यकाळ संपत आहे. त्यामध्ये सर्वात मोठे नाव म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार. त्यांच्यासोबत केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, माजी केंद्रीय मंत्री भागवत कराड यांचाही समावेश आहे. तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी, काँग्रेसच्या खासदार रजनी पाटील, भाजपचे खासदार धैर्यशील पाटील आणि शरद पवारांच्या पक्षाच्या खासदार फौजिया खान याही एकाच दिवशी निवृत्त होत आहेत.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न :
प्रश्न: उज्ज्वल निकम यांना कोणत्या पदासाठी नामनिर्देशित करण्यात आले आहे?
उत्तर: त्यांना राष्ट्रपतींनी राज्यसभेसाठी नामनिर्देशित केले आहे.
प्रश्न: शरद पवार यांचा राज्यसभेतील कार्यकाळ कधी संपत आहे?
उत्तर: त्यांचा कार्यकाळ 2 एप्रिल 2026 रोजी संपत आहे.
प्रश्न: 2026 मध्ये किती राज्यसभा जागा रिकाम्या होणार आहेत?
उत्तर: एकूण 73 राज्यसभा जागा रिक्त होणार आहेत.
प्रश्न: मल्लिकार्जून खर्गे आणि एच.डी. देवेगौडा यांचा कार्यकाळ कधी संपत आहे?
उत्तर: त्यांचा कार्यकाळ 25 जून 2026 रोजी संपत आहे.