
लाखो भाविकांच्या श्रद्धेचे स्थान असलेल्या श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या पदस्पर्श दर्शन रांगेतच शुक्रवारी सायंकाळी एक धक्कादायक प्रकार घडला. दर्शनासाठी उभारण्यात आलेल्या लोखंडी उड्डाणपुलात अचानक विद्युत प्रवाह उतरल्याने मोठी खळबळ उडाली.
या दुर्घटनेत पुलाखाली आश्रयाला असलेल्या तीन श्वानांचा जागीच मृत्यू झाला. यावेळी नागरिकांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे आणि दर्शन रांगेत भाविक नसल्याने संभाव्य मोठा अनर्थ टळला आहे.
आषाढी यात्रेच्या काळात भाविकांची होणारी प्रचंड गर्दी लक्षात घेऊन, दर्शन सुलभ व्हावे यासाठी मंदिर समितीने वॉटरप्रूफ स्कायवॉक आणि दर्शन रांगेची उभारणी केली आहे. मात्र, याच लोखंडी पुलामध्ये शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास अचानक विद्युत प्रवाह उतरला. ही बाब पुलाखालून जाणार्या काही नागरिकांच्या लक्षात आली. त्यांनी तत्काळ प्रसंगावधान राखत महावितरण कार्यालयाशी संपर्क साधला व परिसरातील वीजपुरवठा खंडित करण्याची विनंती केली. कर्मचार्यांनीही तातडीने वीजपुरवठा बंद केल्याने पुढील धोका टळला.
वीजपुरवठा बंद झाल्यानंतर परिसरातील लोकांनी पाहिले असता, पुलाखाली नेहमी बसणारी तीन श्वान निपचित पडलेली दिसली. विजेच्या धक्क्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. या घटनेची माहिती मिळताच मंदिर समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यांनी या घटनेबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली असून, सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. या घटनेमुळे भाविकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
दोषींवर कडक कारवाई होणार
दर्शन रांगेत घडलेली ही घटना अत्यंत गंभीर आहे. या संपूर्ण परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येईल. या कामात ज्यांचा निष्काळजीपणा आढळेल किंवा जे कोणी दोषी असतील, त्यांच्यावर निश्चितपणे कडक कारवाई केली जाईल, अशी माहिती मंदिर समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी दिली.