
ठाकरे गटाचं सूचक वक्तव्य…
गेल्या काही दिवसांपासून शिवसेना (उबाठा) व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या युतीची चर्चा चालू आहे. मात्र, युतीचा निर्णय निवडणुकीवेळी घेतला जाईल, असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे.
तसेच मनसे व शिवसेनेने (ठाकरे) घेतलेला मेळावा हा मराठीच्या विजयापुरता मर्यादित होता असंही राज यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांचे समर्थक गोंधळले आहेत. दुसऱ्या बाजूला निवडणुका जाहीर झाल्यावर युतीबाबत निर्णय घेऊ, असं मत शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलं आहे. तसेच ते म्हणाले, “ठाकरे बंधू एकत्र येऊ नयेत यासाठी अनेकांचे प्रयत्न चालू आहेत.”
शिवसेनेच्या (शिंदे) आमदारांमुळे व मंत्र्यांमुळे पक्ष सध्या अडचणीत सापडला आहे. यामुळे पक्षाचे प्रमुख नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व आमदार, मंत्री व पदाधिकाऱ्यांना तंबी दिली आहे. “बदनामीमुळे काही मंत्र्यांना घरी जावं लागेल”, असं शिंदे म्हणाले आहेत. “कोणाच्याही कुटुंबावर कारवाई करायला आवडणार नाही. तुमच्याकडे दाखवलेलं बोट हे माझ्याकडे असतं”, असंही शिंदे म्हणाले. आमदार संजय गायकवाड व मंत्री संजय शिरसाटांच्या कारनाम्यावर शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. दोन्ही शिवसेना व मनसेमध्ये घडणाऱ्या घडामोडींवर आपलं लक्ष असेल.
दरम्यान, विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन चालू असून आज या अधिवेशनाचा १३ वा दिवस आहे. या अधिवेशनात काय घडतंय याबाबतचे अपडेट्स आपण या लाइव्ह न्यूज ब्लॉगद्वारे जाणून घेणार आहोत.