
विधान परिषदेमधील विरोधी पक्षनेतेपद जाणार; अंबादास दानवेंचा आजच निरोप…
महाराष्ट्र विधान परिषदेमध्ये विरोधी पक्षनेतेपदाचा मोठा राजकीय संघर्ष दिसण्याची शक्यता आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते अंबादास दानवे हे येत्या ऑगस्ट महिन्यात निवृत्त होणार आहेत.
त्यांच्या निवृत्तीनंतर विधान परिषदेमध्ये पक्षाचे संख्याबळ घटणार असून त्यामुळे विरोधी पक्षनेतेपद गमवण्याची शक्यता उद्धव ठाकरे यांच्या पक्षावर निर्माण झाली आहे.
ऑगस्ट 2025 मध्ये अंबादास दानवे यांचा कार्यकाळ पूर्ण होणार असून या आठवड्यात शुक्रवारी अधिवेशन पूर्ण होत असताना आज (बुधवारी) अंबादास दानवे यांचा निरोप समारंभ झाला. दानवे यांच्या निवृत्तीनंतर राजकीय समीकरणांमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता आहे. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपदासाठी आवश्यक असलेले किमान सदस्य संख्याबळ शिवसेना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे राहणार नाही.
या परिस्थितीत काँग्रेस पक्षाकडे विधान परिषदेमध्ये अधिक सदस्य संख्याबळ असल्याने त्यांच्याकडे विरोधी पक्षनेतेपद जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंना आणखी एक राजकीय झटका बसू शकतो. काँग्रेसकडून सतेज पाटील हे विरोधी पक्षनेतेपदाची दावेदार मानले जात आहेत.
काँग्रेस-ठाकरेंचे सदस्य समान
विधान परिषदेमध्ये 78 सदस्य आहेत. सर्वाधिक सदस्य भाजपचे 22 आहेत. त्यानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे 8 सदस्य आहेत. तर, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे सात सदस्य आहेत. विरोधी पक्षात असलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे सात तर काँग्रेसचे सात सदस्य आहेत. मात्र, आता अंबादास दानवे ऑगस्टमध्ये निवृत्त होत असल्याने ठाकरेंच्या सदस्य संख्या सहा होणार आहेत. त्यामुळे सात सदस्य असलेल्या काँग्रेसला विरोधी पक्षनेतेपद मिळण्याची शक्यता आहे.