
अंबादास दानवे हे मराठवाड्यातील एक लढवय्ये नेते आहेत. राज्यातील शेतकरी, महिला, तरुण, नोकरदार व सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नाला सभागृहात वाचा फोडली. विरोधी पक्षनेता म्हणून त्यांनी न्याय मिळवून देण्यासाठी चांगले काम केले, असे गौरवोद्दगार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या निरोपाच्या भाषणात काढले.
विधान परिषदेच्या कठीण वाटणाऱ्या निवडणुकीत केलेल्या मदतीची आठवणही शिंदे यांनी यावेळी दानवे यांना करून देत टाळी देण्याचा प्रयत्नही केला.
अंबादास दानवे (Ambadas Danve) यांच्या विधान परिषद सदस्यत्वाची मुदत येत्या 29 आॅगस्ट रोजी संपत आहे. त्या निमित्ताने आज विधिमंडळाच्या अधिवेशनात सभागृहाच्या वतीने त्यांना निरोप देण्यात आला. शिवसेनेत फूट पडल्यानंतर अंबादास दानवे यांनी सातत्याने माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर अनेकदा सभागृहात आणि सभागृहाबाहेरही जोरदार हल्ला चढवलेला आहे. मिंधे गँग असा उल्लेख दानवे सातत्याने करायचे. मात्र निरोपाच्या भाषणात एकनाथ शिंदे यांनी अंबादास दानवे यांचे तोंडभरून कौतुकच केले.
अंबादास दानवे जेव्हा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते झाले तेव्हा मी त्यांच्या अभिनंदनाचं भाषणं केलं होतं. आता निरोपाच भाषणं करावं लागतं असलं तरी त्यांच्या राजकीय कारकीर्दीला हा पुर्णविराम न ठरता तो स्वल्प विराम ठरावा, अशा सदिच्छा एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी व्यक्त केल्या. चांगल्याला चांगल म्हणा ही बाळासाहेबांची शिकवण आहे, आपण दोघेही बाळासाहेबांच्या पठडीत तयार झालो आहोत. अंबादास दानवे यांनी सभागृहात जनतेचे प्रश्न मांडले, आणि सरकारकडून न्याय मिळवून घेतला. मराठवाड्यातील लढवय्या विरोधी पक्षनेता म्हणून त्यांनी काम केलं, अन्यायाविरुद्ध पेटून उठणारा हा नेता आहे.
विरोधी पक्षनेत्याची भूमिका त्यांनी निभावली नाही तर जिवंत ठेवली. त्यांनी आपल्या कामाची छाप पाडली. अंबादास दानवे माझे चांगले मित्र आहेत, इथे बसलेल्या अनेकांचे ते मित्र आहेत. कुणालाही निरोप देण चांगल नाही, असे सांगतानाच एकनाथ शिंदे यांनी दानवेंना विधान परिषदेच्या निवडणुकीत केलेल्या मदतीची आठवण करून दिली. त्यांची निवडणूक झाली, त्यांना ती लक्षात आहे, त्यांना याची आठवण आहे. अतिशय कठीण वाटणारी निवडणूक त्यांनी लीलया सोपी केली होती, असे शिंदे म्हणाले.
आरएसएसच्या शाखेत ते जात होते, युवामोर्चात त्यांनी काम केले आणि मग शिवसेनेत आले. त्यामुळे सगळं मिळतं जुळतं आहे, असे म्हणत अंबादास दानवे यांना टाळी दिल्याचे दिसून आले. एक कार्यकर्ता म्हणून तुम्ही चांगलं काम केलं आहे. सोन्याचा चमचा घेऊन तुम्ही जन्माला आला नसल्याने तुम्ही सर्व सामान्यांसाठी काम केले. विरोधी पक्षनेता म्हणून तुम्ही जे प्रयत्न केले ते सगळ्यांना माहित आहेत. अतिशय कष्ट घेऊन तुम्ही या पदापर्यंत पोहचलात, त्या पदाला न्याय दिला. विरोधी पक्षनेता तोलामोलाचा तेवढाच महत्वाचा आहे. जनतेच्या प्रश्नावर तो लढा देत असतो.
तुमची बस अन् डेपोही चुकला..
अंबादास दानवे यांचे वडील एसटीमध्ये होते, त्यामुळे लहानपणापासूनच त्यांनी एसटी बस पाहिलेली आहे. पण त्यांची बस आणि डेपो दोन्ही चुकले, असा चिमटा एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणात लगावला. लोकसभा निवडणुकीत त्यांना बसमध्ये बसण्याची संधी होती, असे म्हणत त्यांना उमेदवारीसाठी आॅफर दिल्याचा अप्रत्यक्षरित्या उलगडाही शिंदे यांना सभागृहात केला.
दानवे काम करणारा माणूस आहे, भविष्यात अंबादास दानवे या सभागृहात येतील. प्रत्येकाला करिअर, राजकीय भूमिका असते असे म्हणत शिंदे यांनी दानवे यांना गळ टाकल्याची चर्चाही त्यांच्या भाषणानंतर सुरू झाली. तुम्हाला शुभेच्छा. तुमची कारकीर्द अशीच तळपत राहो,तडफदार, संघर्ष करणारा, सर्वसामन्यासाठी झगडणारा विरोधी पक्षनेता म्हणून तुमची कारकीर्द गाजली, असेही शिंदे म्हणाले.