
पण ठाकरेंनी शिंदेंना टाळलं; नेमकं काय घडलं…
आता पाहूयात ‘फोटो ऑफ द डे’ म्हटल्या जाणाऱ्या ठाकरे आणि शिंदेंच्या फोटोची गोष्ट…. मात्र या फोटोत नेमकं काय आहे? पाहूयात…
एका फोटोचा सोहळा
तारीख- 16 जुलै 2025
वेळ – संध्याकाळी 5 वाजून ३० मिनिटं
ठिकाण- विधानभवनाच्या पायऱ्या
प्रसंग- विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचा निरोप समारंभ..
अंबादास दानवे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवारांसह सगळे आमदार फोटोसेशनसाठी पायऱ्यावर जमलेले. तेवढ्यात पायऱ्यावरुन गर्दीतून वाट काढत उद्धव ठाकरे येताना दिसले….ठाकरेंना येताना पाहिलं आणि आधीच येऊन बसलेल्यांमध्ये थोडी चुळबुळ झाली… शिरसाट बाजूला झाले… आणि सगळेच उभे राहिले. ठाकरे आता पहिल्या रांगेकडे आले… त्यांना आपल्याच दिशेने येताना बघून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दोन्ही हातांनी आपला चष्मा उगाचच सावरला…
आता ठाकरे नेमके बसणार कुठं? सगळ्यांच्या नजरा तेच शोधत होत्या… नेमकं हेच फडणवीसांनी हेरलं आणि ठाकरेंना पुढच्या खुर्चीवर बसण्यासाठी हात केला. खुर्ची पण अशी की साथ सोडून गेलेल्या एकनाथ शिंदे आणि निलम गोऱ्हे यांच्या मधली… ठाकरे खुर्चीवर बसायला गेले तसं शिंदेंनी आपला चेहरा दुसरीकडे फिरवला… उपसभापती नीलम गोऱ्हेंनी उद्धव ठाकरेंना शिंदेंच्या शेजारच्या खुर्चीवर बसायचा आग्रह केला.. आता सगळ्यांचीच पंचाईत झालेली बघून खुद्द उत्सवमूर्तीच धावत आले आणि त्यांनी ठाकरेना आपल्या खुर्चीवर बसण्याचा आग्रह केला… मात्र त्याला नम्र नकार देत ठाकरेंनी नीलम गोऱ्हेंच्या शेजारी बसणं पसंत केलं…या दरम्यान शिंदेंच्या चेहऱ्यावरची चलबिचल काही लपत नव्हती.. अखेर एकदाचा फोटो क्लिक झाला आणि सगळ्यांनीच सुटकेचा निश्वास टाकला. मात्र या फोटोत 3 वर्षानंतर ठाकरे आणि शिंदे एकाच फ्रेममध्ये दिसले आणि सर्वत्रच या फोटोसेशनची चर्चा रंगली.