
मग कपड्यात गुंडाळून नवजात बाळाला फेकले खिडकी बाहेर; राज्य हादरले…
परभणी जिल्ह्यातील पाथरी येथून एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. पाथरी पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम 94 अंतर्गत एका दाम्पत्यावर गुन्हा दाखल केला आहे.
महिलेने धावत्या बसमध्ये बाळाला जन्म दिला. त्यानंतर नवजात अर्भकाला एका कपड्यात गुंडाळले आणि बसच्या खिडकीमधून बाहेर फेकले. पोलिसांनी तपासाअंती या जोडप्याला नोटीस बजावून सध्या सोडून दिले आहे. पाथरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश लांडगे यांनी या घटनेची माहिती दिली आहे. ही घटना मंगळवारी सकाळी 6 वाजता घडली. हे जोडपे एका खासगी बसने परभणीकडे जात होते. हे नवजात मूल मृत आढळले.
दोघेही रोजंदारी मजूर
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे दोघे पुण्यातील चाकण औद्योगिक परिसरात रोजंदारीवर काम करतात. धावत्या बसमध्ये वेदना झाल्यानंतर ही महिला प्रसूत झाली. पण मूल रडत नसल्याने त्यांनी थोडावेळ वाट पाहिली. नवजात बाळ मृत असल्याच्या त्यांच्या लक्षात आले. कायदेशीर अडचणीत येऊ शकतो, या भीतीने या जोडप्याने मूल कपड्यात गुंडाळले आणि धावत्या बसमधून मूल बाहेर फेकले. पाथरी तालुक्यातील देवनंद्रा गावाजवळ या महिलेने धावत्या बसमध्ये बाळाला जन्म दिला.
स्थानिकाने दिली पोलिसांना माहिती
हे जोडपे पुण्याहून परभणीला जात होते. पुण्यातून ते एका खासगी बसने येत होते. देवनंद्रा येथे बस पोहचली तेव्हा महिलेला प्रसव वेदना झाल्या. तिने बसमध्येच मुलाला जन्म दिला. काही मिनिटांनी तिने हे मूल कपड्यात गुंडाळले आणि धावत्या बसमधून बाहेर फेकले. एका स्थानिकाने ही बाब पाहताच पोलिसांना त्याची माहिती दिली. मग पोलिसांनी त्या बसचा पाठलाग केला. त्यांनी जोडप्याला बस खाली उतरवले. महिलेला दवाखान्यात उपचारासाठी भरती केले.
पोलिसांच्या संशय आहे की या दाम्पत्याने मुद्दामहून त्या अर्भकाला बाहेर फेकले. त्यांना त्या अर्भकाची जबाबदारी नको होती, असा पोलिसांचा अंदाज आहे. भारतीय न्याय संहिता, 2023 चे कलम 94(3) आणि 94(5) अंतर्गत दोघांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही दोन्ही कलम बाळाचा मृतदेह गुपचूपपणे लपवणे आणि जन्माविषयीची माहिती न देणे याविषयीची आहेत. पोलिसांनी अर्भक ताब्यात घेतले असून शवविच्छेदनानंतर हे बाळ नेमकं कशामुळे दगावले याची माहिती समोर येईल. त्यानुसार पोलिस पुढील कारवाई करणार आहेत.