
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राज्यात जम्बो नोकरभरतीच्या घोषणेनंतर नाशिक महापालिकेतील रिक्त पदांच्या नोकरभरतीच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
नाशिक महापालिकेतील पहिल्या टप्प्यातील ६७१ पदांच्या भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर मनुष्यबळ कमतरतेच्या समस्येचा सामना करणाऱ्या महापालिकेला यामुळे काहीसा दिलासा मिळू शकणार आहे.
राज्यातील २९ महापालिकांमधील रिक्त ४८ हजार ६८० पदांपैकी २३ हजार ३८१ पदे भरली जाणार आहेत. त्यात नाशिक महापालिकेतील ६७१ पदांच्या भरतीचा समावेश आहे. नाशिक महापालिकेत २४ वर्षांपासून नोकरभरती झालेली नाही. सद्यस्थितीत महापालिका आस्थापना परिशिष्टावरील ७७२५ पदे मंजूर आहेत.
नाशिक महापालिकेचा ब वर्गात समावेश होऊन दहा वर्षांचा कालावधी उलटला तरी महापालिकेचे आस्थापना परिशिष्ट अद्यापही क वर्गीय महापालिकेचेच आहे. २०१७मध्ये महापालिकेचा १४,९४४ पदांचा आकृतिबंध शासनास सादर केला होता. त्यानंतर १६ मार्च २०२३ रोजी शासनाने महापालिकेला पत्र पाठवत सुधारित आकृतिबंध सादर करण्याचे निर्देश दिले होते.
महापालिकेने सर्व विभागांचा आढावा घेऊन ९०१६ पदांचा सुधारित आकृतिबंध महासभेच्या मान्यतेने शासनास सादर केला आहे. सदर आकृतिबंधामध्ये महापालिकेस आवश्यक सर्व संवर्गाचा समावेश करण्यात आला असून, काही संवर्ग हे आवश्यकतेनुसार निरसित करण्यात आले आहेत.
परंतु, अद्याप या आकृतिबंधास शासनाने मान्यता दिलेली नाही. त्यामुळे आकृतिबंधानुसार रिक्त पदांवर भरती प्रक्रियेला चालना मिळू शकली नाही. दरम्यान, कोरोना काळात शासनाने महापालिकेतील अग्निशमन विभागातील ३४८, आरोग्य व वैद्यकीय विभागातील ३५८ अशा एकूण ७०६ पदांसाठी भरती प्रक्रियेला मंजुरी दिली होती. बिंदुनामावली मंजूर नसल्याने या पदांची भरती प्रक्रिया रखडली होती होती. महापालिकेतील रिक्तपदांची संख्या ३५९७ वर पोहोचल्याने मनुष्यबळाअभावी कामकाजात अडथळे येत आहेत. सिंहस्थापूर्वी नोकरभरती करणे आवश्यक आहे. त्यात राज्य सरकारनेच जम्बो भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार महापालिकेकडून प्रस्ताव मागविण्यात आला होता.
राज्यात २३,३८१ पदांची भरती
नाशिकसह राज्यातील २९ महापालिकांमध्ये विविध संवर्गातील ४८,६८० पदे रिक्त आहेत. त्यापैकी २३ हजार ३८१ पदे भरण्याची घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली आहे. त्यात नाशिक महापालिकेतील ६७१ पदांचा समावेश आहे. त्यामुळे महापालिकेतील नोकरभरतीच्या आशा पल्लावित झाल्या आहेत.