
पत्नी कामनाने स्वागताची अशी केली तयारी !
भारतीय अंतराळवीर ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला १८ दिवस अंतराळात घालवल्यानंतर मंगळवारी पृथ्वीवर परतले. शुभांशू शुक्ला यांच्या आगमनानंतर त्यांच्या घरीच नाही तर संपूर्ण देशात आनंदाचे वातावरण आहे.
शुभांशू यांची पत्नी कामना हिने त्यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी केली आहे. ज्यामध्ये घरी बनवलेले जेवण, कुटुंबासोबत आरामदायी वेळ याचाही समावेश आहे.
अंतराळ स्थानकात जाणारे शुभांशु शुक्ला हे देशातील पहिले अंतरळवीर आहे. तसेच अंतराळात जाणारे दुसरे भारतीय आहेत. २५ जून रोजी अमेरिकेतील फ्लोरिडा येथील स्पेसएक्सवरुन ते अंतराळात रवाना झाले होते. तेव्हापासून त्याची पत्नी कामना अमेरिकेहून परत येण्याची वाट पाहत होती.
आवडणारे खाद्यपदार्थ बनवले
शुभांशु शुक्ला यांची पत्नी कामना हिने सांगितले की, शुभांशु पृथ्वीवर परतले आहे. त्यामुळे आमचे पूर्ण लक्ष्य त्यांचे पृथ्वीवरील जीवन सहज बनवण्याकडे असणार आहे. अंतरळातील या प्रवासानंतर त्यांच्यासोबत पुन्हा भेट होणे म्हणजे आमच्यासाठी एक उत्सव आहे. अंतराळात राहताना त्यांना घरचे जेवण खूप आठवले असणार आहे. त्यामुळे त्यांना आवडणारे खाद्यपदार्थ मी बनवले आहेत.
शुभांशु शुक्ला अंतराळातून परत आल्यानंतर ह्यूस्टनमध्ये क्वारंटाइन आहे. २३ जुलैपर्यंत ते क्वारंटाईन राहणार आहे. परिवारातील जवळचे लोक मर्यादीत वेळ त्यांची भेट घेऊ शकतात. शुभांशु यांची पत्नी कामना आणि त्यांचा सहा वर्षांचा मुलगा कियाश त्या ठिकाणी आधीच पोहचले आहे.
इंस्टाग्रामवर भावनिक पोस्ट
शुभांशु यांनी बुधवारी इंस्टाग्रामवर पत्नी आणि मुलासोबतचे काही फोटो शेअर केले आहे. फोटोसोबत भावनिक पोस्ट लिहिली आहे. त्यांनी म्हटले की, पृथ्वीवर परत येणे आणि परिवारातील सदस्यांना मिठी मारणे घरासारखे वाटत आहे. मानवाचे अंतराळ मिशन जादू आहे. परंतु मानवानेच ही जादू बनवली आहे. अंतराळात जाणे रोमांचित असते, पण परिवारातील सदस्यांना भेटणे अद्भूत असते. दोन महिन्यांपासून मी क्वारंटाइन होतो. आठ मीटर लांबीवरुनच परिवारातील सदस्यांसोबत बोलावे लागत होते. माझ्यासाठी हे सर्व आव्हानात्मक होते. आपल्या जीवनात खूप व्यस्त होऊन जातो. त्यावेळी जीवनात व्यक्ती किती महत्वाचे असतात, हे विसरुन जातो. यामुळे प्रियजनांना शोधा आणि तुम्ही त्यांच्याशी किती प्रेम करतात, हे त्यांना सांगा, असे शुभांशु यांनी म्हटले आहे.